आमदार बच्चू कडू महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू महायुतीत सहभागी होतात की काय अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.बच्चू कडू आपल्या रोखठोक राजकीय भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. बच्चू कडू यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र अद्याप ती पूर्ण झालेली नाही.याबाबत बच्चू कडू यांनी अनेकदा उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. अशात बच्चू कडू आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट होणार आहे. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवार यांचा आज अमरावती जिल्ह्यातील दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड होण्याची शक्य ता आहे. शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट आज होणार आहे. दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची चर्चा होणार असल्याचंही बोललं जात आहे.
शरद पवार आज सकाळी १० वाजता आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी येणार आहेत. बच्चू कडू यांच्या निवासस्थानाबाहेर शरद पवार यांच्या स्वागताच्या बॅनर देखील लागले आहे. बच्चू कडू महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू महाविकास आघाडीत सामील होण्याची चर्चा देखील जोर धरू लागली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
चर्चांवर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी असंकाही करण्याची गरज नाही. आम्ही सध्या एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहोत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत असा कोणताही निर्णय घेणार नाही. शिंदे साहेब नसते तर कदाचित आम्ही निर्णय घेतला असता. आमच्या पक्षाचं कुठे भलं होतं, कुठे राजकीय अस्तित्व मजबू होईल तो आमचा सोबत राहिल, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.