आरबीआय धमकी प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीये. मुंबई गुन्हे शाखेने याप्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. वडोदरा आणि गुजरात येथून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना मुंबईत आणण्यात आले आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे. मात्र धमकी देण्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. या तिघांचीही यापूर्वी काही क्राइम हिस्ट्री आहे का याबाबत पोलीस माहिती शोधतायत. मंगळवारी दुपारी दीड वाजता आरबीआयला बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याची धमकी इमेलमध्ये आली होती.
काल आरबीआयच्या कार्यालयात खिलाफत इंडियाच्या ईमेलवरून बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. खिलाफत इंडियाच्या मेलवरून आरबीआय कार्यालयासहित एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेतही बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. या धमकी सत्रानंतर सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
धमकीत काय म्हटलं होतं?
मंगळवारी सकाळी आरबीआयच्या ईमेल आयडीवर खिलाफत इंडियाने धमकी दिली. खिलाफत इंडियाकडून दुपारी दीड वाजता मुंबईतील ११ ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट होतील,अशी धमकी देण्यात आली होती. तसेच ईमेलमध्ये आरबीआयचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या राजीनाम्याची तत्काळ मागणी केली होती. या प्रकरणी आता तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.