सोलापूर: साईंच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. बुधवार २७ डिसेंबर रोजी पहाटे करमाळा तालुक्यातील पांडे गावानजीक फिसरे रस्त्याला कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात चारचाकी वाहनातील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक जण दगावला आहे. मृत भाविक हे कर्नाटक राज्यातील असल्याचे माहिती समोर आली आहे. श्रीशैल चंदेशा कुंभार (वय ५६, गुलबर्गा), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०, गुलबर्गा) आणि ज्योती दिपक हिरेमठ (वय ३८, बागलकोट) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, शारदा दिपक हिरेमठ (वय ७०, हुबळी) यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाविक साईच्या दर्शनासाठी निघाले होते. करमाळा तालुक्यातील सालसेकडून तवेरा गाडी क्र. के. ए. ३२ - एन. ०६३१ ने शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते. कंटेनर क्र. आर. जे. ०६ जी. सी. २४८६ हा फरशी घेऊन करमाळ्याकडून सालसेच्या दिशेने निघाला होता. पहाटे पावने सहा ते सहाच्या सुमारास पांडे गावच्या पुलाजवळील वळणावर या गाड्यांची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला तर तवेरा गाडी रस्त्याच्या खाली पडली.