राज्यात आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान महाविकास आघाडी सोबतच सत्ताधारी महायुतीमध्ये देखील जागावाटपावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. यादरम्यान शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला हव्यतात अशी मागणी अजित पवार गटाकडून केली जात आहे. पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी देखील ही मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, अजित पवार हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी जागा वाटपाबाबत त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे. जवळपास जेवढे शिंदे गटाते आमदार आले आहेत तेवढेच अजित पवार गटाचे आमदार देखील आले आहेत. त्यामुळे सारासार विचार करता त्यांच्या प्रमाणेच आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तसेच असं मत मांडलं तर ते बरोबरच आहे.
दरम्यान अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील जागावाटपाबद्दल माहिती देताना सांगितले की, तारीख ठरलेली नाहीये पण, संसदेचं आणि विधानसभेचं अधिवेशन चालू होतं. तीन राज्यातील मंत्रीमंडळातील विस्तार सुरू होता. आता जानेवारी महिन्यात आमच्या तीनही पक्षाच्या बैठका होणार आहेत. तसेच भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत आमची आणि एकनाथ शिंदे यांची जागावाटपाबात चर्चा होणार असे सांगितले आहे.
आज धेवगिरी येथे बैठक
दरम्यान आज संध्याकाळी अजित पवारांचे निवसस्थान देवगिरी येथे आमदारांची बैठक होणार आहे. यामध्ये आगामी काळात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारी महिन्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा देण्यात याव्यात या संदर्भात चर्चा होणार आहे.