Advertisement

 वर्षाअखेर थंडी आणखी वाढणार !

प्रजापत्र | Tuesday, 26/12/2023
बातमी शेअर करा

राज्यासह देशात तापमानात मोठी घसरण झाली आहे. राज्यासह देशात गारठा वाढला आहे. वर्षाअखेरपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार आहे. काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी सुरु असल्याने उत्तर भारतात थंड वारे वेगाने वाहत आहे. परिणामी उत्तर भारतासह महाराष्ट्रातील तापमानातही घट झाली आहे. दरम्यान, राज्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची रिमझिम होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत उत्तर-पश्चिम आणि लगतच्या मध्य भारताच्या काही भागात दाट ते दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे.

 

राज्यावर पावसाचं सावट
राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये पारा कमालीचा घसरला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर जिल्ह्यात पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमनात मोठी घट पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे, पण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यातही थंडी जाणवत आहे. राज्यातील वर्षाअखेरपर्यंत असंच तापमान राहण्याचा अंदाज आहे.

Advertisement

Advertisement