पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्ते म्हणून महाराष्ट्राला परिचीत आहेत. त्यामुळेच, आपल्या भूमिकेवर बोलताना ते परखडपणे मत मांडतात. नुकतेच बारामती येथे ग्रामपंचायत सरपंचांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना त्यांनी बारामतीने आता माझं ऐकावं असे म्हणत शरद पवारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. बरीच वर्षे त्यांचे ऐकले आता माझे ऐका, असे अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी बारातमतीत राजकीय टोलेबाजी करताना शासकीय धोरणांवरही भाष्य केलं. त्यात, राज्य सरकार चौथे महिला धोरण राबवत असून आता मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढे आईचे नाव लिहावे लागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
इथून पुढे माझं ऐका. कुणाचेही ऐकू नका. मी वयाच्या ६० व्या वर्षी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी तर ३८ व्या वर्षीच घेतला होता अशा शब्दांत अजितदादांनी नाव न घेता होम मैदानातून थेट काकांना लक्ष्य केलं. यावेळी, आपण सत्ताधारी भाजपासोबत का गेलो हे सांगताना अजित पवारांनी राज्य सरकारच्या कामांचाही उल्लेख केला. तसेच, लवकरच राज्यात चौथे महिला धोरणा आणले जाणार असून महिलांचा मोठा सन्मान केला जाईल, असेही अजित पवार म्हणाले.