भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. ज्यामध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले. या निवडीनंतर बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावलेल्या कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.या प्रकरणावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून नव्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तसेच अध्यक्ष संजय सिंह यांचेही निलंबन करण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी (२१ डिसेंबर) निवडणूक पार पडली. संजय सिंह यांनी या निवडणुकीत माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला. या निवडीनंतर बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेल्या कुस्तीपटू साक्षी मलिकने नाराजी व्यक्त करत कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता.तसेच बजरंग पुनियानेही आपला पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान मोदींकडे परत केला होता. या प्रकरणावरुन केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत नव्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केली आहे. तसेच नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांचेही निलंबन करण्यात आले आहे.
काय म्हणाली साक्षी मलिक?
बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय विजयी झाल्यानंतर साक्षी मलिकने थेट कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला होता. "आम्ही ४० दिवस रस्त्यावर झोपलो. देशभरातील अनेक भागातून लोक आम्हाला समर्थन करण्यासाठी आले. यात वृ्द्ध महिलांचाही समावेश होता. आमच्याकडे असेही लोकं आली ज्यांच्यांकडे खायला आणि कमवायला काहीच नाही. आम्ही जिंकू शकलो नाही,मात्र सर्वांचे आभार.. अशा शब्दात जाहीरपणे साक्षी मलिकने आपली नाराजी व्यक्त केली होती.