राज्यभरातील शिवभक्तांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारतर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरील महानाट्य दाखवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ३ दिवस या महानाट्याचा प्रयोग होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त, २ जुन ते ६ जुन २०२४ या कालावधीत राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महानाट्याद्वारे सर्व जिल्ह्यातील जनसामान्य पर्यंत पोहचवण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
४० कोटी रुपये खर्च करुन राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये हे महानाट्य दाखवले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचाराचीं व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना, तरुण पिढीला समजावी, तसेच शिवरायांच्या अलौकिक वारशाला प्रसिद्धी मिळावी, यासाठी या महानाट्याचे नियोजन करण्याते आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, छत्रपती शिवरायांवरील नेमके कोणते महानाट्य असेल हे सरकारने स्पष्ट केले नाही. जून २०२४ पर्यंत या महानाट्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. या महानाट्यासाठी त्या- त्या जिल्ह्यातील नामांकित व्यक्तींना बोलावण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.