राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढला आहे. एकीकडे दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळत असून उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमानातही कमालीची घट झाली आहे. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढल्याने लोक शेकोटीचा आधार घेत आहे. पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 25 डिसेंबर दरम्यान तापमानात किंचित वाढ होईल त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत पुन्हा थंडीची लाट पाहायला मिळणार आहे.
उबदार कपडे अन् शेकोटीचा आधार
राज्यात आठवडाभर कोरडं वातावरण राहणार असून हवेत कमालीचा गारवा जाणवेल. बचाव करण्यासाठी अनेकांनी उबदार कपड्यांसह शेकोटीचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. सकाळपासूनच गुळाचा चहा, मिरची भजे आणि झणझणीत मिसळ खाण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे.