Advertisement

आश्रमशाळेतील सातवीतील मुलीने दिला मुलाला जन्म

प्रजापत्र | Friday, 22/12/2023
बातमी शेअर करा

अहमदनगर-  नगर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत सातवीत शिकणाऱ्या मुलीचे त्याच शाळेतील दहावीत शिकणाऱ्या मुलाशी प्रेमसंबंध जुळले. त्यातून मुलगी गरोदर राहिली. याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या दोघांचा विवाह लावून दिला. गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील एका रुग्णालयात ही मुलगी प्रसुत झाली. त्यावेळी तिचे वय कमी असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना कळविले. चौकशीच हा सर्व प्रकार लक्षात आल्याने पोलिसांनी मुलीच्या फिर्यादीवरून संबंधित अल्पवयीन मुलगा आणि दोन्ही बाजूंच्या पालकांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

 

 

संगमनेर तालुक्यातील मुलीच्या बाबतीत ही घटना घडली आहे. बाभळेश्वर येथील आश्रम शाळेत शिकताना तिचे प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर दोघेही शाळा सोडून एका नातेवाईकच्या घरी राहायला गेले. तेथे त्यांचे संबंध आल्याने मुलगी गरोदर राहिली. ही गोष्ट पालकांपासून लपवून न ठेवता त्यांनी मुलीच्या घरी जाऊन सांगितले. जून २०२३ मध्ये ही मुलगी आईच्या घरी गेली. तिला मळमळ होऊ लागली. त्यामुळे आईने तिच्याकडे चौकशी केल्यावर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तिला रुग्णालयात नेले असता ती गरोदर असल्याचे आढळून आले.

 

 

मुलीच्या पालकांनी मुलाच्या पालकांना हे सांगून लग्नाची गळ घातली. तेही तयार झाले. त्यानंतर आंबेगाव (जि. पुणे) तालुक्यात त्यांचा साध्या पद्धतीने विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहू लागले. मधल्या काळात गरज पडेल तशी ती रुग्णालयात उपचारासाठीही जात होती. मात्र, आपले वय १९ सांगत असल्याने डॉक्टारांनीही त्यात फारसे लक्ष न घालता उपचार व सल्ला देत राहिले. १३ डिसेंबरला मुलीच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे तिला प्रसुतीसाठी रुग्णालात दाखल करण्यात आले. तिने मुलाला जन्म दिला. तेथील डॉक्टरांनी मुलीच्या वयाची चौकशी केली असता ते कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली आणि हा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यावर दोघांनी रितसर विवाह केल्याचे नातेवाईक सांगत होते. मात्र, दोघांनी विवाह केला असला, तरी दोघेही अल्पवयीन असल्याने त्याला कायद्यात आधार नाही. हा बालविवाह ठरतो आणि तो शेवटी गुन्हाच आहे. शिवाय मुलाविरूद्ध तिच्यावर अत्याचार केल्याचाही गुन्हा दाखल केला. पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून संगमनेर तालक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात तपासासाठी वर्ग केला आहे.
 

Advertisement

Advertisement