Advertisement

 कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहली अचानक परतला मायदेशी 

प्रजापत्र | Friday, 22/12/2023
बातमी शेअर करा

दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच दोन मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत. भारताच्या दोन खेळाडूंबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. भारताला आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या कसोटी मालिकेसाठी भारताचा वरिष्ठ संघ खेळणार आहे. पण तत्पूर्वी भारताचा महत्त्वाचा खेळाडू मालिकेतून बाहेर पडला आहे, तर विराट कोहली पहिल्या सामन्यापूर्वी घरी परतला आहे.

 

 

भारताचा धाकड सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे, तर विराट कोहलीला प्रिटोरियामध्ये सुरू असलेल्या तीन दिवसीय संघांतर्गत खेळाला मुकावे लागले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवा सलामीवीर फलंदाज बोटाच्या दुखापतीतून सावरलेला नाही. या कारणामुळे त्याला भारतीय संघ व्यवस्थापनाने रिलीज केले आहे. दुसरीकडे, नुकताच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेसाठी गेलेल्या कोहलीला कौटुंबिक कारणामुळे भारतात परतावे लागले.

 

विराट कोहलीबद्दल नेमके तपशील अद्याप कळलेले नाहीत, परंतु क्रिकबझनुसार, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की सेंच्युरियनमध्ये २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी तो जोहान्सबर्गला वेळेत परत येईल. संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयकडून तीन दिवसांचा सराव सामना वगळण्याची परवानगी मिळाल्यानंतर कोहली तीन दिवसांपूर्वी मुंबईला रवाना झाला. कोहली आज (२२ डिसेंबर) परतण्याची शक्यता आहे.

 

 

 

२६ वर्षीय गायकवाडला १९ डिसेंबर रोजी पोर्ट एलिझाबेथ येथे यजमानांविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बोटाला दुखापत झाली होती. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना बोटाला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. बीसीसीआयने तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना सुरू होण्यापूर्वी सांगितले की, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली तो दुखापतीतून बरा होईल. दोन्ही कसोटी सामन्यांपूर्वी तो बरा होण्याची कोणतीही शक्यता नाही आणि संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयशी सल्लामसलत केल्यानंतर लगेचच त्याला रिलीजचा निर्णय घेतला आहे. तो शनिवारपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे.

 

 

दरम्यान, सराव सामना आज संपणार आहे. अहवालानुसार, यामध्ये बहुतांश भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. सरफराज खान आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी त्यांच्या संधीचा पुरेपूर उपयोग केला, तर कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर प्रभावी छाप पाडताना दिसले.

Advertisement

Advertisement