महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग गुजरातला हलिवण्यात येता आहेत. त्यानंतरही हे सरकार झोपेत आहे. सध्याची स्थिती पाहता राज्य सरकार गुजरातच्या दावणीला बांधलेले दिसतेय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार सोमवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. दरम्यान त्यांनी परिधान केलेले शिक्षक भरतीचा मुद्दा मांडणारे जॅकेट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
मुंबईत हिऱ्याचा व्यवसाय दीड लाख कोटींहून अधिकचा आहे. हा व्यवसाय सांभाळून ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, गुजरात सरकार हा उद्योग अहमदाबादला घेऊन जाण्याचा घाट रचत आहे. गुजरातचे व्यापारी सातत्याने मुंबईतील हिऱ्यांच्या मोठ्या व्यापाऱ्यांशी संपर्कात आहेत.
महाराष्ट्रातील उद्योग तिथे हलविण्यासाठी विविध प्रकारची आमिषे देण्यात येत आहेत. परंतु, राज्यातील नेते दिल्लीला मुख्यमंत्रीसह विविध पदे मागण्यात मश्गुल आहेत. उद्योग खाते झोपलेले आहे. हिरे व्यवसाय राज्यातून गुजरातला गेल्यास सुमारे दोन लाख लोकांचा रोजगार जाणार आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता राज्यातील भाजप सरकार गुजरातसाठी काम करतेय का, असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.