मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी दिलेला अल्टिमेटम जवळ येत आहे, तसं सरकारवरील दबाव वाढत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. त्यावर ते ठाम आहेत. दुसरीकडे सरकारने देखील हालचाली सुरु केल्या आहेत.मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या शिंदे समितीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी १ वाजता ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथे होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. मात्र राज्य सरकार दोन पर्यायांवर काम करत आहे. यासाठी सरकारला वेळ वाढवून द्या, अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली होती.मात्र मनोज जरांगे पाटील वेळ वाढवून न देण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम असल्याने सरकारकडून आता हालचालींना वेग आला आहे. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे समितीने आतापर्यंत विविध जिल्ह्यात जाऊन केलेल्या कामाचा आढावा घेणार आहे.
शिंदे समितीचा आरक्षणाचा जर दुसरा अहवाल आज समितीने सुपूर्द केला, तर तो अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून मुख्यमंत्री सोमवार किंवा मंगळवारी विधीमंडळात ठेवण्याची शक्यता आहे.