नागपूर - आठ दिवसांपूर्वी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, ही बाब सरकारने लपवून ठेवली. त्यांच्यावर कोणत्या दोन आमदारांचा दबाव होता. त्यांच्या राजीनाम्यात काय दडलंय, हे पुढे यायला हवे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्याने खळबळ माजली आहे. यावर सत्ताधारी पक्षाने सौम्य भूमिका घेतली आहे. तर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घेरले आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी थेट या राजीनाम्याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सदनमधील भ्रष्टाचारप्रकरणी ईडीने दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,‘मी आता भुजबळांकडे पेढा खायला तर प्रफुल्ल पटेलांकडे कमी मिरची असलेले जेवण करायला जाणार आहे. ज्याप्रमाणे भुजबळांना जडीबुटी मिळाली त्याचप्रमाणे इतरांनाही मिळो.’