हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीच्या कलानुसार आता या राज्यात काँग्रेसचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानलं जाते. राज्यात विधानसभा निवडणुकीत रेवंत रेड्डी हे प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. बीआरएस प्रमुखाला घेरण्यासाठी ते कोडांगल ते कामारेड्डी इथं निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. ५४ वर्षीय रेवंत रेड्डी तेलंगणात काँग्रेसची मोठी ताकद म्हणून पुढे आले आहेत. रेवंत रेड्डी हे सध्या लोकसभेचे खासदार आहेत. त्यामुळे रेवंत रेड्डी खासदार ते थेट मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत रेवंत रेड्डी सर्वात पुढे आहेत.
आंध्र प्रदेशच्या काळात रेवंत रेड्डी कोडांगल येथून आमदार म्हणून विजयी झाले होते. २००९ आणि त्यानंतर २०१४ मध्ये ते टीडीपीच्या तिकीटावर निवडून आलेले रेवंत रेड्डी २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसमधून पराभूत झाले होते. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं त्यांना मल्काजगिरी लोकसभेच्या जागेवरून उमेदवारी दिली. रेवंत रेड्डी यांनी मजबूतपणे या जागेवर यश मिळवले आणि लोकसभेत पोहचले.२०१८ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा त्यांनी घेतला. आता २०२३ च्या निवडणुकीत रेवंत रेड्डी यांनी केसीआर यांना धोबीपछाड दिला आहे. रेवंत रेड्डी यांच्या मेहनतीमुळे काँग्रेस पहिल्यांदाच राज्यात सरकार बनवत आहे. रेवंत रेड्डी यांनी अभाविपच्या माध्यमातून विद्यार्थी नेता म्हणून राजकारणाला सुरुवात केली. आता रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहेत.