मुंबई- अजित पवार म्हणजे शब्दाला जागणारा नेता, २०१४ ला निवडणूक हरल्यानंतर माझी लायकी न बघता विधानपरीषदेची संधी दिली. पण ज्यांच्यामुळे अर्धा पक्ष फुटला ते आता विचारतात की अजित पवार यांनी पक्षासाठी काय केलं? असं म्हणत धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. तसेच सांगलीत राहून आरआर आबांना कुणी कसा त्रास दिला हे सर्वांनाच माहिती आहे असंही ते म्हणाले. अजित पवार गटाच्या पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
धनंजय मुंडे म्हणाले की, “शब्दाला जागणारा आणि तो शब्द पाळण्यासाठी जगणारा नेता एकच आहे आणि तो म्हणजे अजित पवार. काही जणांना वाटतं अजित पवार यांनी लगेच मागणी पूर्ण करावी, परंतु ते शक्य नाही. त्यांनी जर शब्द दिला तर तो पाळल्याशिवाय राहत नाहीत. अजित पवारांनी अनेकांना अनेक जबाबदाऱ्या दिल्या, २०१४ ला निवडणूक हरल्यानंतर माझी लायकी न बघता विधानपरीषदेची संधी दिली. अजित पवार यांनी मला पक्षत घेतलं नसतं तर परळी विधानसभा मतदारसंघ आपण जिंकला असता का?”
जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा
निरंजन डावखरे, गणेश नाईक यांना कुणाला कंटाळून पक्ष सोडावं लागला याच उत्तर द्या असं म्हणत धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी जे काम केलं ते कधी सांगत नाही. ज्यांच्यामुळे अर्धा पक्ष फुटून गेला तो विचारतो अजित पवारांनी पक्षासाठी काय केलं? असाही टोला त्यांनी लगावला.
स्वर्गीय आबा जिवंत असते तर त्यांनी सांगितलं असतं की, सांगलीत राहून सांगलीतच कुणी कसा त्रास दिला असं म्हणत धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला. सुनिल शेळके यांना पक्षात घेण्यापूर्वी तिकीट जाहीर झालं, ते कुणी केलं? असाही त्यांनी प्रश्न विचारला. त्यावेळी सामाजिक न्यायाची जबाबदारी मला कुणी दिली माहिती नाही, पण मला वाटतं त्यावेळी अजित पवार यांच्या हातात तो निर्णय नसावा असंही मुंडे म्हणाले.