गेल्या काही दिवसांपासून आमदार अपात्रता प्रकरणाची नियमित सुनावणी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. या सुनावणीत अनेक दावे-प्रतिदावे, आरोप केले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. मात्र, दिलेल्या मुदतीत निकाल देणे कठीण असून, यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. एकीकडे आमदार अपात्रता प्रकरणाची नियमित सुनावणी होत असताना दुसरीकडे विधिमंडळाचे कामकाज असणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी मुदतीत सुनावणी घेऊन निर्णय घेणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. हे सर्व करताना राहुल नार्वेकर यांची तारेवरची कसरत होणार असून, ओव्हरटाइम करावा लागेल, असे म्हटले जात आहे. विधिमंडळाचे दैनंदिन कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी घेतली जाऊ शकते, असा कयास बांधला जात आहे.