राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही बाजूने पक्षावर आणि पक्षचिन्हावर दावा केला जात आहे. याबाबतची सुनावणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या फुटीत महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी शरद पवार यांनी राज्यसभेच्या सभापतींकडे केली आहे.यानंतर अजित पवार गटाने खेळी केली आहे.शरद पवार गटानंतर अजित पवार गटाने देखील लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे .
याचिका दाखल करताना अजित पवार गटाने शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव याचिकेतून वगळले आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर कारवाई केल्यास या दोन्ही नेत्यांना सहानभुती मिळू शकते. त्यामुळे या दोघांची नावे वगळल्याची सूत्रांची माहिती आहे.तर अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिल्यानं त्याचं नाव वगळले. अजित पवार गटाकडून आपल्याकडे लोकसभेत दोन सदस्य असल्याचा दावा केला जात आहे.