जालना - आधी मराठा आरक्षण आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणावरून चर्चेत आलेल्या जालन्यात आता धनगर आरक्षणासाठी भव्य मोर्चा निघणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने उद्या (२१ नोव्हेंबर) रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
जालना जिल्हा सध्या आरक्षणाच्या मागण्यांच्या केंद्रबिंदू बनला असल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केल्याने याची राज्यभरात चर्चा पाहायला मिळाली. त्यानंतर, गेल्या आठवड्यात झालेली ओबीसी सभा देखील जालन्यातील अंबडमध्ये झाली. असे असतांना आता धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी देखील जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या भव्य असा महामोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
'या' आहेत मागण्या...
धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची (एसटी) अंमलबजावणी करावी
शहरातील अंबड चौफुली परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास जागा उपलब्ध करून द्यावी
जातनिहाय जनगणना करण्यात यावी
मेंढपाळांना शस्त्र परवाने द्यावे, मेंढ्यांना चरण्यासाठी वने राखीव ठेवावी
शेळी मेंढी विकास महामंडळास दहा हजार कोटींचा निधी देण्यात यावा
प्रत्येक जिल्ह्यात धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्तीगृह उपलब्ध करून द्यावे
आरक्षण लढयात शहीद झालेल्या समाजबांधवांच्या कुंटूबातील एकास शासकीय नोकरी द्यावी
शासनामार्फत सवलतीच्या दरात कर्ज द्यावे
सर्वच क्षेत्रातील खासगीकरण रद्द करावे आदी मागण्या नमुद करण्यात आल्या आहे.