Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - अभिमानास्पद चंद्रस्पर्श

प्रजापत्र | Thursday, 24/08/2023
बातमी शेअर करा

पृथ्वीवरील सर्वच देशांना चंद्राचे आकर्षण कायम राहिलेले आहे. भारतीय जनमानसाने तर पिढ्यानपिढ्या चंद्राशी भावनिक नाते जोडलेले आहे या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरविणारा भारत हा जगातला पहिला देश बनला आहे. तमाम भारतीयांसाठी हा क्षण अभिमानाचा आहे. इस्रो ही आमची संस्था आज जगभरातून अभिनंदनाला पात्र ठरली आहे. आज या क्षणी या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वच घटकांचे मन:पूर्वक अभिनंदन.

       

साऱ्या जगाचे लक्ष लागलेली भारताची चांद्रयान मोहीम अखेर यशस्वी झाली. चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आपली काबिलीयत पुन्हा एकदा सिध्द केली आहे. यापूर्वी २००८-०९ मध्ये चांद्रयान १ मोहिमेत अद्वितीय यश मिळवून इस्रोने आपण चंद्रावर जाऊ शकतो हे दाखवून दिले होतेच. नंतरच्या काळात २०१८-१९ मध्ये एका छोट्या अपघातामुळे चांद्रयान २ मोहीम काहीशी फसली तरी या मोहिमेने देखील खूप काही शिकवले होते. म्हणूनच आज चांद्रयान ३ च्या अद्वितीय यशानंतर जगभरातून भारताचे, इस्रोचे अभिनंदन होत आहे. या मोहिमेतील प्रत्येक सहभागी घटक खऱ्या अर्थाने या अभिनंदनाला पात्र आहेच. सर्वच भारतीयांची मान ताठ व्हावी आणि छाती अभिमानाने फुलून यावी असा हा क्षण आहे. या मोहिमेसाठी प्रोत्साहन, प्रेरणा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते अगदी शेवटचा घटक म्हणून काम करणाऱ्या तंत्रज्ञाचे देखील म्हणूनच अभिनंदन करायलाच हवे.

मात्र हे करतानाच, माध्यमांमधून याचे जे राजकीयकरण सुरु झाले आहे ते शोभणारे नक्कीच नाही. खरेतर आजच्या यशाचा आनंद साजरा करताना श्रेय द्यायला हवे ते इस्रोला, पण केवळ पंतप्रधान पदावरील व्यक्तीचा चेहरा वारंवार दाखविणे आणि त्यांच्याशिवाय हे होणारच नव्हते असे काही पसरविणे ही आपल्या उज्वल परंपरेशी प्रतारणा आहे.

      चांद्रयान ३ ही काही भारताची स्वातंत्र्यानंतरची पहिलीच अंतराळ मोहीम नाही याचे भान असणे आवश्यक आहे. यशाचे श्रेय घ्या, अभिनंदन देखिल स्वीकारा, पण ज्यांनी, ज्या पिढ्यांनी इस्रो सारख्या संस्था उभारल्या त्यांचे आभार तरी मानणार का नाही? सत्तर वर्षात देशात काहीच झाले नाही असे म्हणणाऱ्या आणि २०१४ नंतरच देशाला स्वातंत्र्य मिळाले असे बरळणाऱ्या उपटसुंभांसाठी १९६९ ला पंडित नेहरुंच्या संकल्पनेतून आणि स्वप्नातूनच इस्रो उभारली गेली होती. १९७५ ला इस्रोने आर्यभट्ट नावाचा पहिला भारतीय उपग्रह अवकाशात सोडला होता, याची जाणीव भक्त मंडळींना करुन देणे आवश्यक आहे. आजपर्यंत इस्रोने तब्बल ६५८ अंतराळ मोहिमा केल्या आहेत, त्यातील काहींमध्ये यश, कोठे अपयश आले असेलही, अशा मोहिमांमध्ये यशापयश अपेक्षित असतेच, ते पचविण्याचा आणि ज्याचे श्रेय त्याला देण्याचा मोठेपणा, उमदेपणा सर्वांनीच दाखवायला हवा.

Advertisement

Advertisement