Advertisement

नऊ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षांचा सश्रम कारावास

प्रजापत्र | Monday, 21/08/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - घरासमोर खेळणाऱ्या ९ वर्षीय अल्पवयीन बालिकेस घरात नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या २३ वर्षीय नराधम तरुणास अंबाजोगाई अपर सत्र न्या. संजश्री घरत यांनी सोमवारी (दि.२१) वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पंधरा हजार रूपये दंड ठोठावला. बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात (पोक्सो) अंबाजोगाई सत्र न्यायालयातून एवढी मोठी शिक्षा देण्याची हि पहिलीच वेळ आहे.

 

दिड वर्षापूर्वी अंबाजोगाई तालुक्यात सदरील घृणास्पद घटना घडली होती. गतवर्षी १९ मार्च रोजी ९ वर्षीय पिडीत बालिका मैत्रिणीसोबत घरासमोर खेळत होती. यावेळी तिच्या घरातील सर्वजण शेतात कामाकरीता गेले होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास पिडीतेच्या मैत्रिणी चप्पल आणण्यासाठी घरी गेल्याची संधी साधून किरण राजेभाऊ शेरेकर (वय २३) या तरुणाने पिडीतेस बहाण्याने त्याच्या घरी बोलावून नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला व याबाबत कोणाला सांगीतले तर तुला व तुझ्या चुलत्याला मारून टाकीन अशी धमकी दिली. सदर फिर्यादीवरून किरण शेरेकर याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा गुन्हा नोंद करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.

 

 

पिडीतेची आणि डॉक्टरांची साक्ष ठरली महत्वाची

सदर प्रकरणाची सुनावणी अपर सत्र न्या. संजश्री घरत यांच्या न्यायालयासमोर झाली. सरकार पक्षातर्फे अकरा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीतेची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली. तसचे सदर प्रकरणातील वैद्यकिय तपासणी करणाऱ्या डॉ. ज्योती डावळे यांची साक्ष देखील अत्यंत महत्वाची ठरली. साक्षीपुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद व त्यांनी सादर केलेले केस लॉ ग्राहय धरून नायालयाने आरोपी किरण शेरेकर यास दोषी ठरवून वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पंधरा हजार रूपये दंड ठोठावला.

 

सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला प्रभावी

न्यायालयासमोर सरकारी वकील ॲड. लक्ष्मण बा. फड यांनी युक्तिवादामध्ये सांगितले की, लहान मुले ही देशाची संपत्ती आहेत. समाजात लहान मुलावर अशा स्वरूपाच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे संसदेस हा विशेष कायदा स्थापित करावा लागला ही बाब लक्षात घेवून आरोपीस कडक शिक्षा द्यावी अशी विनंती केली. ही बाब विचारात घेवून न्यायालयाने आरोपीस वीस वर्षे सक्तमजुरीची व पंधरा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. पीडीतेच्या घरच्यांनी निकाला बद्दल समाधान व्यक्त केले. सदर निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्रांचे लक्ष लागून होते.

 

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. लक्ष्मण बा. फड यांनी अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडली व त्यांना ॲड. अनंत बी. तिडके यांनी सहकार्य केले व सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधर यांनी केला व कोर्ट पोलीस पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ठाकुर, पो.हे.कॉ. गोविंद कदम, पो. हे. कॉ. बाबुराव सोडगीर व पो.हे.कॉ. शालन राउत यांनी काम पाहीले.

Advertisement

Advertisement