अंबाजोगाई - अंबाजोगाई पिपल्स बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जड यांचे -हदयविकाराने २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता लातुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
अंबाजोगाई शहरातील गुरुवार पेठ विभागातील रहिवासी असलेले संजय जड यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर आपल्या नोकरीची सुरुवात येथील अंबाजोगाई पिपल्स बॅंकेत कनिष्ठ लिपिक या पदापासून सुरुवात केली. आपल्या कामाच्या पध्दतीवर, बॅंकींग क्षेत्रातील अभ्यासाच्या कौशल्यावर व संचालक मंडळाचा विश्वास संपादन करीत त्यांनी अल्पावधीतच मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वोच्च पदावर मजल मारली.
मागील आठवड्यात ते कळसूबाई शिखर सर करण्यासाठी गेले होते. शिखरावर चढाई करत असतांनाच श्वसनाचा त्रास होवू लागल्यामुळे ते परत आले. अंबाजोगाई येथे प्राथमिक तपासण्या करुन ते पुढील उपचारासाठी लातुर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. उपचार सुरु असताना प्रकृतीने त्यांची साथ न दिल्यामुळे आज २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता त्यांनी लातुर येथील खाजगी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.
उद्या अंत्यविधी
संजय जड यांच्या निधनाच्या बातमीने संपुर्ण शहरातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.