अंबाजोगाई - लोखंडी सावरगाव येथील सुर्यभान नारायणराव बनसोडे पत्नी आणि मुलीसह घरासमोर उभे असताना त्याचे शेजारी अनंत ज्ञानोबा बनसोडे व इतर पाच जणांनी तू आमच्या भिंतीच्या विटा का काढल्यास असे म्हणत भांडणाची कुरापत काढून त्यांना दगड मारून गंभीर दुखापत केली होती. 2014 सालच्या या प्रकरणात गुरूवारी आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्याचा निकाल अंबाजोगाईचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी झेड.झेड.खान यांनी दिला आहे.
या प्रकरणाची हकीकत अशी की, दि.2 मे 2014 रोजी अनंत ज्ञानोबा बनसोडे, सुरेश ज्ञानोबा बनसोडे, मनिषा अनंत बनसोडे, शोभा ज्ञानोबा बनसोडे, सरूबाई भ्र.ज्ञानोबा बनसोडे, प्रियंका भ्र.सुरेश बनसोडे सर्व रा.लोखंडी सावरगाव ता. अंबाजोगाई जि.बीड यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून तु आमच्या भिंतीच्या विटा का काढल्यास असे म्हणून भांडणाची कुरापत काढली व सुर्यभान नारायणराव बनसोडे, त्यांची पत्नी व मुलगी हे घरासमोर उभे असताना त्यांना जवळ पडलेला दगड फिर्यादी व मुलगी विद्या हिच्या डोक्यात मारून दुखापत केली. तसेच इतरांनीही मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दि.2 मे 2015 रोजी ग्रामिण पोलिस स्टेशन अंबाजोगाई येथे फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हेडकॉन्टेबल पी.एस.नखाते यांनी करून सर्व आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र मा.न्यायालयात दाखल केले. यावरून मा.न्यायालयाने आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र निश्चित केले. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकुण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, अंबाजोगाई झेड.झेड.खान यांनी गुरूवार, दि. 3 ऑगस्ट 2023 रोजी या प्रकरणातील सर्व आरोपींना दोषी ठरवून 1 वर्ष सश्रम कारावास तसेच 6 महिने सश्रम कारावास तसेच रूपये 12 हजार असा प्रत्येकी दोन हजार व जखमी फिर्यादी त्याची पत्नी सत्यभामाबाई, मुलगी विद्या व रूपाली यांनी प्रत्येकी 3 हजार नुकसान भरपाईचा आदेश दिला आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड.एन.बी.केंद्रे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.ज्ञानोबा फड यांनी सहकार्य केले.