मराठवाड्याच्या मातीत जन्मून ज्यांनी राज्यभर आपल्या कर्तृत्वाचा गंध पसरविला, शेतीमातीच्या केवळ कविता केल्या नाहीत, तर नोकरीसोडून ज्यांनी स्वतःला शेतीमातीमध्ये गुंतवून घेतले , ज्यांच्या कवितांनी निसर्ग बोलता झाला आणि ज्यांनी अखेरपर्यंत शेतीमातीच्या विकासाचाच गोष्टी केल्या , असे निसर्गकवी, रानकवी ना. धो. महानोर यांची एक्झिट हुरहूर लावणारी आहे. एक संपन्न जीवन महानोर जगले आणि त्यांनी तरुणाईला सुद्धा शेतीमातीची ओळख करून दिली, असा कवी पुन्हा होणे नाही.
ना. धो. महानोर यांचे जाणे साहित्य विश्वासोबतच कृषी क्षेत्राला देखील हुरहूर लावणारे आहे. ज्याकाळात साहित्यिक म्हणजे अभिजन मानले जायचे आणि निसर्गाच्या कविता करणारे फारसे निसर्गाशी जालिक करताना दिसायचे नाहीत, त्या काळात शेतीमातीच्या कविता करणारा एक कवी स्वतः शेती करतो आणि आपल्या शेतीमधल्या प्रयोगांनी देखील नावलौकिक मिळवितो हे उदाहरण महानोर यांनीच घालून दिले. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड येथे जन्मलेल्या महानोरांनी आपल्या गावचेच नव्हे तर मराठवाड्याचे नाव उज्वल केले.
ग्रामीण मराठी जीवन, शेतकऱ्यांचे आयुष्य आणि शेतीमातीतले बारकावे हे त्यांच्या कवितांचे विषय राहिले, या कवितांसोबतच त्यांनी अनेक गीते देखील लिहिली , पण या सर्वांचा आत्मा बहुतेक वेळा शेती आणि शेतकरी हाच राहिला. त्यामुळेच त्यांची ओळख रानकवी अशी झाली. बालकवींच्या कवितांचा त्यांच्यावर प्रभाव असला तरी त्यांची स्वतंत्र अशी काव्यप्रतिभा त्यांच्या प्रत्येक कलाकृतीमधून आवर्जून पाहायला मिळते. हसत हसत दुःख सोसण्याची जी ग्रामीण मानसिकता आहे ते दाखविणारी त्यांची 'सरलं दळण , ओवी अडली जात्यात , उभ्या जन्माचा उमाळा ,कळ सोसून डोळ्यात ' या शब्दांमधील भावना , त्यातील जिवंतपण असेल किंवा ' वैशाखाच्या वेणा, जाईजुईची कहाणी , लक्तरांचा जीव , किती झाकावा पानांनी ' या शब्दात मांडलेलं शेतकरी जीवनाचं वास्तव असेल, महानोर, शेतीमाती आणि शेतकऱ्यांशी किती एकरूप झाले होते हेच यातून समोर येतं .
महाराष्ट्राच्या सर्व भागात पोहचलेले कवी असतानाही महानोर यांनी कधी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळावे म्हणून प्रयत्न केले नाहीत किंवा साहित्य क्षेत्रातील राजकारणात त्यांनी स्वतःला कधी अडकवून घेतले नाही. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन शरद पवार यांनीच त्यांना राज्य विधानपरिषदेवर संधी दिली, तेथेही त्यांनी या सभागृहाचा वापर शेतकरी आणि शेती याच विषयासाठी केला. यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत अनेक राजकारण्यांसोबत उठबस असताना देखील ते कधी राजकारणी झाले नाहीत. पद्म्श्री पुरस्काराने त्यांचा झालेला सन्मान असेल किना त्या अगोदर आणि नंतरही विविध संस्था आणि संघटनांनी त्यांचे केलेले सत्कार असतील, कोणत्याही सरकारने किंवा सन्मानाने ते कधी हुरळून गेले नाहीत आणि शेतीमातीशी असलेले नाते त्यांनी कधी तोडले नाही . अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत ते शेती, शेतकरी, पीकविमा अशा अनेक विषयांवर प्रबोधन करीत राहिले. असा या प्रबोधनाच्या वाटेवरचा पथिक आज प्रवास संपवून थांबला आहे. या रानकवींना भावपूर्ण श्रद्धांजली.