बंगळूरू येथे झालेल्या विरोधीपक्षांच्या बैठकीत अखेर विरोधीपक्षांच्या आघाडीचे नाव ठरविण्यापासून ते जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यापर्यंत अनेक विषयांवर चर्चा करून काही गोष्टी अंतिम करण्यापर्यंत विरोधीपक्ष पोहोचले आहेत. केंद्रातील भाजप सरकार किंवा नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधीपक्षांची मोट बांधण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत, त्या प्रयत्नांमधील आणखी एक पाऊल या बैठकीच्या माध्यमातून पडले आहे. त्यामुळे आता ही विरोधकांची 'इंडिया' नावाची आघाडी भविष्यात कसे आव्हान उभा करते हे पाहणे महत्वाचे ठरेल. बाकी भाजपचे नेते एकीकडे विरोधीपक्षांच्या आघाडीची टर उडवीत असले तरी या आघाडीच्या हालचालीनंतरच भाजपला अडगळीत ठेवलेल्या रालोआ (राष्ट्रीय लोकशाही आघाडीची) आठवण व्हावी यातच सारे काही आले.
देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने मंगळवारी घडलेल्या दोन बैठका महत्वाच्या आहेत. पहिली बैठक देशातील बहुतांश विरोधी पक्षांची, कर्नाटकातल्या बंगळुरूमध्ये झालेली. या बैठकीत विरोधी पक्षांनी बऱ्यापैकी एकमताच्या दृष्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद मल्लिकार्जुन खरगे सारख्या पोक्त व्यक्तीकडे असल्याचा परिणाम या बैठकीत प्रकर्षाने दिसून आला. काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे, त्यामुळे आम्ही म्हणू तेच ही जी भूमिका आतापर्यंत काँग्रेसकडून घेतली जायची आणि विरोधीपक्षांच्या एकजुटीतील महत्वाचा अडसर म्हणून ज्याकडे पहिले जायचे, यावेळी काँग्रेसने आपली भूमिका बदललेली पाहायला मिळाले.
यावेळी पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतर ठरविला जाईल यावर विरोधीपक्षांचे एकमत व्हावे यातच खूप काही आले. कारण मुळातच विरोधी पक्षांमध्ये मोठ्याप्रमाणावर प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांच्या प्रादेशिक अस्मिता असल्यातरी त्यासोबतच देशपातळीवर प्रत्येकालाच पंतप्रधानपद कायम खुणावत आले आहे हे वास्तव आहे. त्यामुळेच या सर्वांचे जमायचे कसे हा कोणालाही पडणारा प्रश्न होता. आज तरी त्यावर सर्व विरोधीपक्षांनी पांघरूण टाकले आहे, किंवा हा विषय बाजूला ठेवला आहे. विरोधीपक्षांची आघाडी आता 'इंडिया' या नावाने ओळखली जाणार असून या बैठकीत अनेक विषयांवर झालेले एकमत, आम आदमी पक्षासह अनेकांची उपस्थिती, महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय वातावरणाची पार्श्वभूमी असतानाही शरद पवार यांनी लावलेली उपस्थिती आणि विरोधी पक्षांनी त्यांना दिलेला प्रतिसाद, हे सारे पाहता विरोधी पक्षांची व्यापक आघाडी आज सर्वांनाच हवीहवीशी वाटत आहे, किंवा सर्वांची ती गरज बनली आहे असे समजायला हरकत नाही. मुळात प्रादेशिक पक्षांचे आपसातील असलेले वाद म्हणा किंवा अनेक राज्यांमध्ये काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष यांच्यातील असलेला राजकीय संघर्ष म्हणा, विरोधी पक्षांच्या आघाडीतील हाच मोठा अडसर आतापर्यंत असायचा आणि भविष्यातही मतभेदाचा मुद्दा हाच असू शकतो, मात्र आज तरी यावर सौम्य भूमिका घेण्यात किंवा चर्चेचे दरवाजे उघडे ठेवण्यात 'इंडिया' यशस्वी ठरली आहे, आणि विरोधीपक्षांच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी आहे. खऱ्या अर्थाने हे विरोधी पक्षांचे निवडणुकांच्या दिशेने पडलेले आणखी एक पाऊल आहे.
जसे विरोधीपक्षांच्या आघाडीचे, तसेच भाजपचे. ज्यावेळी पाटण्यामध्ये विरोधीपक्षांची पहिली बैठक झाली होती, त्यावेळी भाजपने त्यांची खिल्ली उडविली होती. त्यानंतर बंगळुरू येथील बैठकीला देखील हिणविण्याचे काम भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि इतरांनी केलं. या आघाडीला 'कुणबा' म्हणून संबोधण्यापर्यंत भाजपची मजल गेली. मात्र आज भाजपवर देखील असाच 'कुणबा' जमविण्याची वेळ आलेली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्यावेळी जी राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन झाली होती, त्या आघाडीला २५ वर्ष झाल्याचा भाजपला साक्षात्कार होण्यास विरोधकांची बैठक कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट आहे. मागच्या काही वर्षात, विशेषतः मोदींनी सत्ता मिळविल्यानंतर आणि त्यातही मोदी दुसऱ्यांदा सत्तारूढ झाल्यानंतर, भाजप जणू काही हे रालोआचे सरकार आहे हे विसरलाच होता. 'शतप्रतिशत' हाच भाजपचा नारा होता. मधल्या काळात अकाली दल असेल किंवा शिवसेना , रालोआच्या संस्थापक पक्षांपैकी असणारे हे पक्ष भाजपपासून दुरावत असताना भाजपने सत्तेच्या मस्तीत त्याची फारशी तमा बाळगली नव्हती. मात्र आता पुन्हा जुन्या सहकाऱ्यांशी जुळवून घेण्याची खेळी भाजपला खेळावी लागत आहे. हा नियतीने भाजपवर उगवलेला राजकीय सूड आहे. आज अगदी लहानात लहान पक्षाला देखील भाजप चुचकारत आहे. याशिवाय 'मन की बात' या मोदींच्या कार्यक्रमातून ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आणि त्यांच्यापैकी काहींना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता त्यांना कार्यक्रमांच्या दोन दिवसानंतर आपल्या पक्षाच्या मंत्रीमंडळात सन्मानाने त्यांच्या अटी व शर्ती मान्य करुन समाविष्ट करुन घेतले यातच त्यांचा 'शतप्रतिशत' चा अहंकार केव्हाच डळमळीत झाला असल्याचे स्पष्ट आहे. आता भाजपलाही रालोआ आठवावे हे देखील भाजपच्या बदलून घ्याव्या लागलेल्या भूमिकांचेच एक पुढचे पाऊल आहे.