एकवेळ राजकारण सोडेन, पण माझ्या विचारधारेशी तडजोड करणार नाही, असे सांगत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणातून दोन महिने सुट्टी घेण्याची घोषणा केली. मुळात राजकारण काही दुकान किंवा नोकरी नाही, किंवा फावल्या वेळात करण्याचा व्यवसाय देखील नाही, त्यामुळे यातून काही काळ सुट्टी घेता येत नसते, आणि दोन महिन्यांच्या सुट्टीने असा काय फरक पडणार आहे. मुळात पंकजा मुंडे यांना राजकारणातील विचारधारांची कितीही चाड असली, तरी आजच्या राजकारणात तत्व आणि विचारधारा उरलीय कुठे?
माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे काँग्रेस प्रवेश करणार असल्याच्या चर्चानी राजकारणाचा बाजार गरम झाल्यानंतर स्वतः पंकजा मुंडेंनीच त्याचा खुलासा केला, हा खुलासा करताना पंकजा मुंडेंनी सध्याच्या राजकारणाबद्दल देखील अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. मी विचारधारेचे राजकारण करते, आणि माझ्या मूळ विचारधारांशी तडजोड करण्याची वेळच आली, तर एकवेळ मी राजकारण सोडेन, मात्र तत्वांशी तडजोड करणार नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडेंच्या या भावनांचा खरेच आदर करावा लागेल. मुळात लोकशाही व्यवस्थेत हेच अपेक्षित होते . मात्र अपेक्षांपेक्षा वास्तव नेहमीच वेगळे असते आणि आजकालच्या राजकारणात तर ते अधिकच वेगळे असते. पंकजा मुंडे यांना याची जाणीव नाही असेही नाही, तरीही त्या विचारधारेच्या राजकारणाबद्दल बोलत असतील तर ही अपेक्षा कितीही चांगली आणि आदर्श असली तरी आज तरी तो केवळ कल्पनाविलास आहे.
पंकजा मुंडे विचारधारांची बाब त्या इतर पक्षात जाणार नाहीत यासाठी उच्चारली असेलही कदाचित, पण भाजपमध्ये तरी विचारधारा कोठे शिल्लक आहे? तशी तर काही अपवाद वगळता बहुतांश राजकीय पक्षाकडे असे काही वैचारिक राजकारण राहिले आहे असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही, मात्र पंकजा मुंडे या भाजपच्या नेत्या आहेत, आणि त्यांनी विचारधारांशी तडजोड नको असे म्हटले आहे, म्हणून याठिकाणी भाजपचा जास्त विचार करु. आज जो पक्षांतरबंदी कायदा आहे तो कायदा व्हावा यासाठी एकेकाळी आजच्या भाजपच्या आणि पूर्वीच्या जनसंघाच्या नेत्यांनी संसदेत रणकंदन केले होते. संसदेच्या भाषणांमधून जर लालकृष्ण आडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे काढून ऐकली , तर आज जी घाऊक पक्षांतर घडवून आणली जात आहेत, पक्ष फोडले जात आहेत, त्या मागची 'महाशक्ती' ही कोणती विचारधारा आहे आणि असल्या पक्षांतरांमधून मिळणारी सत्ता भाजपला कशी पचू शकते हाच खरा प्रश्न आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पडत असताना त्यांना काही तडजोडी करता आल्या असत्या, मात्र 'सरकारे आयेगी, सरकारे जायेगी पर लोकतंत्र बना रहना चाहिये. जो सत्ता गलत तरीके से मिले, उसे मै तिनके से भी छुना पसंद नही करुंगा' असे सांगणाऱ्या वाजपेयींची विचारधारा ही भाजपची विचारधारा होती, ते राजकारण खऱ्याअर्थाने तत्वांचे होते, आजच्या भाजपमध्ये ते राजकारण आणि ती तत्वे उरली आहेत का?
कालपर्यंत ज्यांच्यावर आरोप केले आज त्यांच्यासोबतच सत्तेची पोळी खाण्यासाठी जी काही उठाठेव सुरु आहे त्या राजकारणाला वैचारिक राजकारण म्हणता येणार आहे का? आणि तसे नसेल तर मग पंकजा मुंडेंसारख्या नेत्यांनी दोन महिन्यांची सुट्टी घेतली काय अन दोन वर्षांची सुट्टी घेतली काय, त्यातून साधणार काहीच नाही. मुळात अशी सुट्टी घ्यायला राजकारण म्हणजे काही सरकारी किंवा कंपनीचे कार्यालय नाही, सरकारी कार्यालयांमध्ये अधिकाऱ्याला जर एखादा निर्णय स्वतः घ्यायचा नसेल तर तो काही दिवस रजेवर जातो आणि मग त्याच्या अनुपस्थितीत इतर कोणीतरी प्रभारी अधिकारी ते काम करून टाकतो. पण राजकारणात तसे नसते, तुम्हाला जर एखाद्या गोष्टीला विरोध करायचा असेल तर तो सुट्टीवर जाऊन करता येणार नाही, तर त्या व्यवस्थेत तसल्या गोष्टींच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून हे चुकतेय असे सांगण्याची तयारी हवी, ती तयारी कोणत्याही परिणामांची पर्वा न करता पंकजा मुंडेंनी दाखवायला हवी.