Advertisement

संत गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईत जोरदार स्वागत

प्रजापत्र | Wednesday, 14/06/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.१४ (वार्ताहर)- गजानन महाराज यांच्या पालखीचे अंबाजोगाई शहरात टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात आगमन झाले. संत गजानन महाराज यांच्या पालखीस अंबाजोगाई येथील भावीकांनी पुष्पहार अर्पण करून व महाराजांच्या मूर्तीस पुष्पअर्पण करून स्वागत केले. पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळी काढून अंबानगरी सज्ज झाली होती.

       २६ मे २०२३रोजी आषाढी वारीसाठी संत गजानन महाराजांच्या पालखीचे शेगाव येथुन प्रस्थान झाले आहे. दोन दिवसांच्या परळी येथील मुक्कामानंतर पालखीचे आज दुपारी अंबाजोगाई शहरात आगमन झाले. टाळ मृदंगाच्या तालावर शेकडो वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामांच्या गजरात ठेका धरला. पंढरीनाथ महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल, संत गजानन महाराज की जय, गण गण गणात बोले या जयघोषाने एकापाठोपाठ सुंदर अश्या चालीवर भजन करत या वारकऱ्यांनी अंबाजोगाई शहर अक्षरशः दणाणून सोडले.

पूर्वी या पालखी सोहळ्यामध्ये हत्ती घोडे असा लवाजमा असायचा परंतु गेल्या काही वर्षापासून फक्त आश्वच या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे. प्रस्थानाच्या मार्गावर विविध गावांमध्ये शहरांमध्ये संत गजानन महाराज पालखीचे उत्स्फूर्तपणे स्वागत आणि पूजा केली जाते.

पालखीचे हे ५४ वे वर्ष असून पालखीत शेगाव येथून तीन अश्व आणि ७०० वारकरी सहभागी आहेत. यात काही टाळकरी तर काहींच्या हाती भगव्या पताका आहेत. हा संत गजानन महाराज पालखी सोहळा हा अत्यंत शिस्तबद्धव विशिष्ट अशा चौकटीत मार्गक्रमण करणारा म्हणून ओळखला जातो.

             संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असून रात्री भजन कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक १५ गुरुवारी सकाळी ८.०० वाजता संत गजानन महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरसाठी अंबाजोगाई शहरातून प्रस्थान होईल.

Advertisement

Advertisement