नवी दिल्ली - भारतीय रेल्वे आपल्या दैनंदिन कामात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतेय. नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ट्रेन अधिक सुरक्षित आणि वेगवान केल्या जाताय. यासोबतच टेक्नॉलॉजीच्या मदतीने प्रवाशांच्या सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. दरम्यान, रेल्वे आता आपले तिकीट छापखाने बंद करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी काळात रेल्वे तिकीट प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होईल का? नजीकच्या भविष्यात ते होण्याची शक्यता कमी आहे. वास्तविक, रेल्वे तिकीट छपाई खाजगी क्षेत्राकडे सोपवण्याची शक्यता आहे.
2017 मध्ये, तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आपला विचार व्यक्त केला होता. ते म्हटले होते की, सरकार तिकीट छपाईचे काम थर्ड पार्टी म्हणजेच खाजगी क्षेत्राकडे सोपवण्याचा विचार करतेय वृत्तानुसार, रेल्वे छापखाने बंद करण्याची ही पहिलीच वेळ नाही. रेल्वेकडे एकूण 14 प्रिंटिंग प्रेस होत्या, त्यापैकी 9 बंद करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलाय. यानंतर रेल्वेकडे शिल्लक राहिलेले 5 छापखाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आदेश जारी
याबाबतचे आदेश रेल्वेकडून बोर्डाने विभागीय रेल्वेला दिले आहेत. बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भायखळा (मुंबई), हावडा (कोलकाता), शकूरबस्ती (दिल्ली), रोयापूर (चेन्नई) आणि सिकंदराबाद येथील सध्याचे रेल्वे प्रिंटिंग प्रेस बंद करण्यात येतील. इथे रेल्वेची रिझर्व्ह आणि जनरल दोन्ही तिकिटे छापली जायची. यासोबतच कॅशच्या पावत्या आणि 46 प्रकारची मनी व्हॅल्यूचे कागदपत्रेही येथे छापण्यात आली. आता त्याचे आदेश जरी दिले गेले असले तरी ही प्रेस बंद करण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी 2019 मध्येच घेण्यात आला होता.
ऑनलाइन तिकीट विक्रीत वाढ
रेल्वे आता तिकीट पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. लेटेस्ट वृत्तानुसार सध्या काउंटरवरून फक्त 19 टक्के तिकिटे खरेदी केली जातात. त्याच वेळी, 81 टक्के तिकिटे ऑनलाइन विकली जाताय. ही खूप मोठी संख्या आहे. त्यामुळे संपूर्ण डिजिटलायझेशनचे उद्दीष्ठ सहज गाठता येईल असंही रेल्वेला वाटतं.