राज्यभरात अजूनही अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे गेले काही दिवस राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. ऐन उन्हाळ्यात पावसासारखे वातावरण नागरिक अनुभवत आहे. हवामानातील या बदलामुळे साथीचे आजार बळावण्याचा धोकाही आरोग्य विभागाने वर्तवला आहे.
यामुळे राज्यात पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रातील मालदीव बेटांजवळ समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे विदर्भापासून, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळेच आज विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागावरही याचा परिणाम होईल. परिणामी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज ढगाळ वातावरण राहील. तर, काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
पावसाळ्यात मात्र कमी पावसाची शक्यता
दरम्यान, राज्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण आहे. अनेक जिल्ह्यात तर सलग तीन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे तर, अनेक ठिकाणी गारपीठही झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, अकोला , अहमदनगर, सोलापूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यामुळे फळ, भाज्या आणि धान्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, भर उन्हाळ्यात पाऊस पडत असला तरी एप्रिल महिन्यात व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत एल निनोचा प्रभाव 80 ते 85 टक्क्यांदरम्यान असेल. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची चिन्हे आहेत.
ग्रामीण भागात गारपीट
भारताच्या एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर आहे. या दोन्ही दिशांकडून महाराष्ट्राकडे वारे वाहत असतात. या वाऱ्यांमध्ये बाष्प असते. त्याचबरोबर हे वारे उष्ण असतात. सध्या पश्चिमी विक्षोभीय वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. हे वारे अतिशय थंड असते. त्यांचे तापमान -70 ते -60 अंश सेल्सियस असते. हे दोन्ही वारे परस्परांना धडकतात. त्यामुळे ढगांची निर्मिती होऊन शहरात अवकाळी पाऊस पडत आहे. तर, ग्रामीण भागात तापमान आणखी कमी असल्याने तेथे गारपीट होत असल्याचे छत्रपती संभाजीनगरमधील महात्मा गांधी मिशनच्या खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.