परळी- जवाहर शिक्षण संस्थेच्या संचालक पदाच्या निवडणूकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची बुधवारी हितचिंतक सभासद म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. हितचिंतक सभासद या गटात उमेदवारी अर्ज दाखल केलेले बालाजी गिते यांनी माघार घेतली. यापूर्वी आश्रय दाता सभासद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाली होती. जवाहर शिक्षण संस्थेच्या एकूण 34 संचालक पदाच्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 34 पैकी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण-भावाच्या दोन जागा बिनविरोध निघाल्याने आता 32 जागेसाठी निवडणुका होणार आहेत.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या जवाहर शिक्षण संस्था संचालक मंडळाच्या 34 जागांसाठी 6 मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी हितचिंतक सभासद गटातून उमेदवारी दाखल केली. त्यांच्या विरोधात बालाजी रामचंद्र गिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बालाजी गिते यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने पंकजा मुंडे बिनविरोध विजयी झाल्या आहेत. यापूर्वी आश्रयदाता सभासद गटातुन आमदार धनंजय मुंडे हे बिनविरोध निवडून आल्याने आता 32 जागेसाठी निवडणूक होणार आहे. परळीत जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ महाविद्यालयातील संचालक पदाची निवडणूक बारा वर्षानंतर होत आहे.