अंबाजोगाई - येथून जवळच असलेल्या बुट्टेनाथ घाटात राज्य परिवहन मंडळाची बस पलटी झाली. हा अपघात आज मंगळवारी (दि.१८) दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास झाला.
सदरील बस अंबाजोगाईकडून येलडा कडे निघाली होती. मुकुंदराजच्या बुट्टेनाथ घाटात एका अवघड वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. या अपघातात २५ प्रवाशी जखमी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी तातडीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना घटनास्थळी पाठवून दिले. तर, स्वाराती रुग्णालयातील यंत्रणाही सुसज्ज ठेवली. सर्व जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, सुदैवाने बस दरीत न कोसळल्याने मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
बातमी शेअर करा