Advertisement

BARTI च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर

प्रजापत्र | Wednesday, 12/04/2023
बातमी शेअर करा

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्याचवेळी बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

या मागणी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि शिष्टमंडळाचे प्रतिनीधी उपस्थित होते. यावेळी ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली. त्यांचे स्वागत करतानाच विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असा मुद्दाही यावेळी विद्यार्थ्यांनी मांडला.

फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून बार्टी, सारथी, टीआरटीआय,महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश दिले.

विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात जल्लोष केला
बार्टीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (बीएएनआरएफ) ही फेलोशिप दिली जाते. दरवर्षी ठाराविक विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र महाज्योती आणि सारथी या संस्थांकडून ओबीसी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशिप सरसकट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापार्श्वभूमीवर बार्टीनेही सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती. त्यासाठी गेल्या ५२ दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला विविध संस्था संघटनांनी पाठींबा दर्शविला होता. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. यावेळी शिंदे यांनी विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत त्यांना दिलासा दिला. ही मागणी मान्य केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात जल्लोष करत आनंद साजरा केला.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी बार्टीने केवळ २०० विद्यार्थ्यांची फेलोशिपसाठी निवड यादी जाहीर केली होती. याला विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. विविध सामाजिक संघटनांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन पाठींबा दर्शविला होता. तसेच विद्यार्थ्यांनीही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात जल्लोष करत आनंद साजरा केला.

विद्यार्थ्यांच्या एकीपुढे सरकार नमलं
गेल्या ५२ दिवसांपासून पीएचडी संशोधक विद्यार्थी आपले संशोधन आणि अभ्यास केंद्रे सोडून मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलनाला बसले होते. विद्यार्थी कल्याणच्या बुद्ध विहारात रात्रीचा आश्रय घेऊन पुन्हा आंदोलनासाठी आझाद मैदानात जमत. गेली ५२ दिवस त्यांचा हा दिनक्रम होता. कल्याण ते सीएसएमटी दररोज ये जा करुन आणि दिवसभर आंदोलन करुन मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची दिवसेंदिवस हानी होत होती. अखेर विद्यार्थ्यांच्या एकजुटीपुढे सरकार झुकलं असून शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

Advertisement

Advertisement