२०२३ या वर्षाच्या उत्तरार्धात जगात पुन्हा एकदा मंदी येऊ शकते, अशी चर्चा आर्थिक विषयांच्या जाणकारांमध्ये पाहायला मिळत आहे. अमेरिकेत या मंदीचं केंद्र असेल, असंही म्हटलं जात आहे. त्याअनुषंगाने एकीकडे जगभरातील देश आर्थिक मंदीसाठी तयारी करत असताना दुसरीकडे पाकिस्तानमात्र आत्ताच मंदीच्या गर्तेत अडकल्याचं दिसून येत आहे. इम्रान खान पंतप्रधानपदावरून पयउतार होण्याआधीपासून पाकिस्तानवरचं आर्थिक संकट अद्याप निवळण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीयेत. त्यातच पाकिस्तानमधला महागाईचा दर तब्बल ३५ टक्क्यांवर गेल्यामुळे पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेनं मोठा निर्णय घेतला आहे.
१०० टक्क्यांनी व्याजदरात वाढ!
भारतात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरामध्ये अवघ्या काही पॉइंटने वाढ करताच बाजारपेठेत मोठ्या घडामोडी घडल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. पण पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ पाकिस्तान अर्थात देशातील केंद्रीय बँकेनं मोठं पाऊल उचललं आहे. पाकिस्तानमधील बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदरामध्ये तब्बल १०० पॉइंटची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय बँकेने घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान स्टेट बँकेचा व्याजदर आता २१ टक्के इतक्या विक्रमी स्तरावर गेल्याचं पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानी रुपयाच्या गटांगळ्या!
दरम्यान, एकीकडे आर्थिक संकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना दुसरीकडे पाकिस्तानी रुपयाच्या गटांगळ्या अद्याप सुरूच आहेत. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाच अवमूल्यन हा देशापुढे चिंतेचा विषय ठरला आहे. त्यात जागतिक पातळीवर आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झालेली असताना त्याचाही परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे.
आशियातील इतर देशांवरही परिणाम?
दरम्यान, पाकिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असताना शेजारी देशांसाठीही ही चिंतेची बाब ठरत आहे. आधीच दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तान जगासाठी डोकेदुखी ठरला असताना ढासळत्या आर्थित स्थितीमुळे पाकिस्तानमधील बेरोजगार तरुणाई मोठ्या संख्येनं दहशतवादाकडे वळण्याची भीती वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये अन्नधान्याची मदत मिळवण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन १६ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं.