अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना महिलांनी घेरल्याची घटना समोर आली आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) किमती जास्त आहेत, त्या कमी कराव्यात, असंही म्हटलं आहे. महिलांच्या या विनंतीवर अर्थमंत्र्यांनी त्यांना समाधानकारक उत्तर दिलं आहे. सिलिंडर का महाग झाला आहे आणि त्याच्या किमती नेमक्या कधी कमी होऊ शकतात हे स्पष्ट केलं आहे.
सीतारामन तामिळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यातील पाज़हियसीवरम गावात पोहोचल्या होत्या. येथून त्यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 'वॉल टू वॉल' प्रचाराला सुरुवात केली. या मोहिमेच्या सुरूवातीच्या काळात ही घटना घडली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना समोर पाहून महिलांनी त्यांना सिलिंडर स्वस्त करण्याचे आवाहन केले. काही दिवसांपूर्वी स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती आणि सिलिंडरची किंमत 1100 रुपयांवर गेली आहे.
गावाला भेट देणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे का? अशी विचारणा केली. यानंतर गृहिणींच्या एका गटाने त्यांच्याशी स्वयंपाकाच्या गॅससंदर्भात चर्चा केली. त्यांचा एकच प्रश्न होता की स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी कराव्यात, म्हणजे त्यांचे बजेट बिघडू नये. या मागणीसाठी गावातील सर्व महिलांनी निर्मला सीतारामन यांना बराच वेळ घेराव घातला.
महिलांना उत्तर देताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, स्वयंपाकाच्या गॅसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार ठरवली जाते. आपल्या देशात स्वयंपाकाचा गॅस नाही. आम्ही फक्त आयात करतो. जेव्हा आपण ते आयात करतो तेव्हा तिथे किंमत वाढली तर इथेही किंमत वाढते. तसेच तिथे भाव कमी झाल्यास इथेही भाव कमी होतील. अर्थमंत्री म्हणाले, "गेल्या दोन वर्षांत किमती फारशा कमी झाल्या नाहीत."
गावातील महिलांशी संवाद साधल्यानंतर अर्थमंत्री भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या निवासस्थानी पोहोचले, तेथे त्यांनी कमळ चिन्ह रंगवून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अर्थमंत्र्यांनी 'वॉल टू वॉल' ही थीम दिली आहे. भाजपाच्या निवडणुकीच्या प्रचाराचे फलक प्रत्येक गावात भिंतीवर कोरणे हा यामागचा उद्देश आहे. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.