Advertisement

बेलेश्वर मंदिरावर चालला बुलडोझर

प्रजापत्र | Monday, 03/04/2023
बातमी शेअर करा

इंदूरमधल्या बेलेश्वर महादेव मंदिरात रामनवमीला झालेली दुर्घटना आजही लोक विसरू शकलेले नाहीत. रामनवमीच्या दिवशी मंदिरात असलेलं विहिरीचं छत कोसळून ३६ लोकांचा मृत्यू झाला. त्याच मंदिरावर आज बुलडोझर चालवण्यात आला. या मंदिराच्या शेजारी असलेलं सगळं अतिक्रमण हटवण्यास सुरूवात झाली. इंदूरमध्ये सकाळपासूनच या कारवाईची चर्चा आहे.

 

 

काय घडली होती घटना?
इंदूरमध्ये ३० मार्चच्या दिवशी रामनवमीचा उत्सव सुरू होता. त्यावेळी या मंदिरात असलेल्या विहिरीचं छत कोसळलं आणि या घटनेत ३६ भाविकांचा मृत्यू झाला. यानंतर आज या ठिकाणी जे जे अवैध बांधकाम आहे ते तोडण्यासाठी आणि अतिक्रमण हटवण्यासाठी नगर पालिकेचे कर्मचारी बुलडोझर घेऊन आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसही तैनात करण्यात आले होते. 

 

बेलेश्वर मंदिराच्या आसपास असलेलं अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम हटवण्यासाठी पाचपेक्षा जास्त पोकलेन आणि एक जेसीबी यांची मदत घेण्यात आली. नगरपालिकेचे उपायुक्त, एडीएम आणि इतर अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. एवढंच नाही तर या मंदिरात असलेली विहिर आता कायमची बुजवण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारे पुन्हा अशी दुर्घटना घडू नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर टीका केली होती. सात दिवसात मंदिराच्या भोवती असलेलं अवैध बांधकाम पाडलं नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊन याचिका दाखल करू असं कमलनाथ यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ही कारवाई आता करण्यात आली आहे. जेव्हा दुर्घटना घडली त्यानंतर मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार ते विहिर हा मार्ग लोखंडी सळ्या लावून बंद करण्यात आला होता.

Advertisement

Advertisement