देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये गेल्या वर्षभरापासून काहीच बदल करण्यात आलेला नाहीय. बॅरलचा दर घसरला तरी कंपन्या किंमत कमी करत नव्हत्या. उलट जेव्हा वाढत होता तेव्हा दिवसागणिक इंधनाचे दर ३०-३५ पैशांनी वाढविले जात होते. आता पुन्हा ते दिवस परतण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामागे सौदी अरेबियाने अमेरिकेसह सर्वांना अनपेक्षित असलेली घोषणा केल्याचे कारण आहे.
जगातील सर्वाधिक कच्चे तेल उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये सौदी अरेबियाचा समावेश आहे. सोमवारी बाजार सुरु होताच कच्च्या तेलाच्या किंमतीत सहा टक्क्यांची वाढ झाली. सौदी अरेबियासह ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन दररोज १० लाख बॅरलनी कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे वेस्ट टेक्सस इंटरमीडिएट कॉन्ट्रॅक्ट (WTI) ची किंमत 80.01 डॉलर प्रति बॅरलवर गेली. तर ब्रेंट क्रूडची किंमत 5.67 टक्क्यांनी वाढून 84.42 डॉलर प्रति बॅरलवर गेली आहे.
कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करणाऱ्यांमध्ये सौदीसह इराक, युएई, कुवेत, अल्जेरिया आणि ओमान हे देश आहेत. ऑक्टोबरनंतरची मोठी कपात आहे. तेव्हा ओपेक प्लस देशांनी दररोजच्या उत्पादनात २० लाख बॅरल कपातीची घोषणा केली होती.
संकट एवढेच नाही तर तिकडे रशियाने देखील कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपातीची घोषणा केली आहे. रशियाने दररोज ५ लाख बॅरल कच्चे तेल कमी उत्पादित करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने या देशांना उत्पादन वाढवण्यास सांगितले होते. परंतू या देशांनी उलट निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केल्याने महागाई वाढू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे केंद्रीय बँकांवर व्याज वाढवण्याचा दबावही वाढू शकतो.
भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अखेरचा बदल केला होता. मे महिन्यात केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. दिल्लीत सध्या पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये आणि कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये आहे. कच्च्या तेलात कपात झाल्याने हे दर पुन्हा वाढू लागण्याची शक्यता आहे.