'सर्वच चोरांचे आडनाव मोदी का असते...' या विधानाशी संबंधित मानहाणीच्या एका प्रकरणात सुरत कोर्टाने 23 मार्च रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 मार्च रोजी राहुल याचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यानंतर 11 दिवसांनंतर राहुल या निर्णयाविरोधात सुरतच्या सेशन कोर्टात याचिका दाखल करणार आहेत.वृत्तसंस्था काँग्रेस सूत्रांचा दाखला देत राहुल यांची लीगल टीम 3 मार्च (सोम) रोजी कोर्टात जाणार असल्याचा दावा केला आहे.23 एप्रिल रोजी राहुल यांच्या हजेरीत न्यायालयाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा व 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर काही वेळातच कोर्टाने त्यांना जामीनही मंजूर केला होता. तसेच शिक्षेलाही 30 दिवसांची स्थगिती दिली होती. म्हणजे या काळात राहुल यांना अटक होणार नाही. त्यांना याविरोधात उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल.
जेल की अपील, पक्षश्रेष्ठींमध्ये दुमत
राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात पक्षही 2 गटांत विभागला गेल्याचे सूत्रांनी दिव्य मराठीला सांगितले. या निर्णयाविरोधात राहुल यांनी उच्च न्यायालयात जावे, अशी एका गटाची इच्छा होती. दुसरीकडे, राहुल तुरुंगात गेल्यास पक्षाला सहानुभूती मिळेल व आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा होईल, अशी दुसऱ्या गटाची इच्छा आहे.
पक्षाचे मतैक्य, राजकीय व कायदेशीर लढा लढणार
सूत्रांच्या माहितीनुसार, अखेरीस ही लढाई राजकीय व कायदेशीर अशा दोन्ही आघाड्यांवर लढण्याचा निर्णय झाला. पण निकालाचे गुजरातीतून इंग्रजीत भाषांतर करण्यास विलंब झाल्यामुळे शिक्षेविरुद्ध न्यायालयात जाण्यास उशीर झाल्याचा दावा काँग्रेसने केला.
राहुल लीगल टीमवर नाराज
या निर्णयाला आव्हान द्यायचे की तुरुंगात जायचे यावर पक्षनेतृत्वात एकमत नव्हते. तुरुंगात गेल्याने सहानुभूतीची लाट निर्माण होईल, असे एक मत होते. दुसरे हे की आव्हान न देणे म्हणजे चूक मान्य केल्यासारखे ठरेल. त्यामुळे यासंबंधीचा अंतिम निर्णय सोनिया गांधींवर सोपवण्यात आला. 4 वर्षांपासून सुरू असलेला हा खटला गांभीर्याने न लढवणाऱ्या आपल्या कायदेशीर टीमवर राहुल गांधी चांगलेच नाराज असल्याचे बोलले जात आहे.
12 एप्रिल रोजी पाटणा कोर्टात होणार हजर
मानहाणीच्या अन्य एका प्रकरणात राहुल गांधी 12 एप्रिल रोजी पाटणा न्यायालयात हजर होणार आहेत. राहुल यांनी मोदी आडनाव असलेल्यांचा चोर म्हणून अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्यावर वेगवेगळ्या राज्यांमध्ये मानहानीचे 5 गुन्हे दाखल आहेत. यापैकी एका प्रकरणात सुरत न्यायालयाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.