Advertisement

सुरेश रैनाच्या तीन नातेवाईकांचा खून करणारा आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार

प्रजापत्र | Sunday, 02/04/2023
बातमी शेअर करा

उत्तर प्रदेश पोलीस राज्यातली गुन्हेगारी संपवण्यासाठी सध्या अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. पोलिसांना नुकतंच एक मोठं यश मिळालं आहे. यूपी पोलिसांनी मुजफ्परनगरमधील शाहपूर परिसरात कुख्यात गुंड राशिदला एन्काउंटमध्ये ठार केलं आहे. राशिदच्या डोक्यावर ५० हजार रुपयांचं बक्षीस होतं. गुन्हेगारी जगतात राशिदचं नाव ‘चलता-फिरता’ असं होतं. तसेच त्याला ‘सिपहिया’ या नावानेदेखील गुन्हेगारी जगात ओळखत होते. या एन्काउंटरदरम्यान एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.

 

 

मुजफ्फरनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजीव कुमार म्हणाले, राशिदच्या डोक्यावर १४ ते १५ गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या तीन नातेवाईकांच्या खुनाच्या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. राशिदने २०२० मध्ये पठाणकोटमध्ये माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याचे काका (आत्चाचे पती), काकी (चुलत्याची पत्नी) आणि चुलत भावाची हत्या केली होती.

 

 

शोधमोहीम सुरू असताना पोलिसांनी मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोघांना अडवलं. हे दोघेही आंतरराज्यीय टोळीचे सदस्य होते. या दोघांपैकी एक राशीद होता. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. परंतु राशिदकडून गोळीबार सुरू झाला, त्यानंतर पोलिसांनीही बचावात गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात राशीद ठार झाला, तर त्याचा साथीदार दुचाकी सोडून शेतात पळून गेला. राशीदच्या कपड्यांमधून पोलिसांनी दोन शस्त्रे जप्त केली आहेत.

Advertisement

Advertisement