भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी (Salim Durani) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अफगाणिस्तानातून येऊन भारताकडून क्रिकेट खेळणारे दिग्गज क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. 2 एप्रिल रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचं निधन झालं आहे. सलीम दुर्राणी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते, ज्यांचा अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला. भारतीय संघासाठी, त्यांनी एकूण 29 कसोटी सामने खेळले आणि त्यात 1202 धावा केल्या. या 1202 धावांमध्ये एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी 75 विकेट्सही घेतल्या आहेत.
काबूलमध्ये जन्म, नंतर कराचीमध्ये स्थायिक
भारतीय क्रिकेट संघात सामील होऊन नाव कमावणारे फिरकीपटू असलेले अष्टपैलू सलीम दुर्रानी यांचा जन्म 11 डिसेंबर 1934 रोजी झाला. त्याचा जन्म अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झाला होता. परंतु, काही काळानंतर दुर्रानी कुटुंब 8 महिन्यांच्या सलीमला घेऊन पाकिस्तानातील कराची येथे गेले आणि तिथेच स्थायिक झाले. मात्र, भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर दुर्रानी कुटुंब भारतात आले. त्यानंतर सलीम भारतातच लहानाचे मोठे झाले.
अजुर्न पुरस्काराचे मानकरी ठरलेले पहिले क्रिकेटपटू
भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांच्या निधनाने भारतीयांवर शोककळा पसरली आहे. दुर्राणी हे दीर्घकाळ आजारी होते. त्यांची कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील जामनगरमध्ये सलीम दुर्राणी यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सलीम दुर्राणी अर्जुन पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटपटू आहेत. 1960 मध्ये त्यांना क्रीडा जगतातील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
13 वर्ष टीम इंडियाकडून क्रिकेट खेळलं
काबूलमध्ये जन्मलेल्या सलीम दुर्रानी यांनी 1 जानेवारी 1960 रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी पहिला कसोटी सामना खेळला होता. हा त्याचा पदार्पणाचा सामना होता. दुर्रानी यांनी जवळपास 13 वर्ष भारताकडून क्रिकेट खेळलं आहे. यादरम्यान, त्यांनी 29 कसोटी सामन्यांमध्ये 25.04 च्या सरासरीनं फलंदाजी करत 1202 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने आपल्या बॅटनं त्यांनी 1 शतक आणि 7 अर्धशतकं झळकावली आहेत.
सलीम दुर्रानी यांची एक खासियत
सलीम दुर्रानींची एक खासियत म्हणजे, ते चाहत्यांच्या मागणीनुसार षटकार ठोकत असत. याशिवाय सलीम यांनी गोलंदाजीतही नाव कमावलं आहे. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 75 विकेट्सही घेतल्या आहेत. डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून सलीम यांची ख्याती होती. सलीम दुर्रानी यांनी केवळ कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी शेवटची कसोटी 06 फेब्रुवारी 1973 रोजी इंग्लंडविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळली होती.
बॉलिवूडमध्येही आजमावलं नशीब
भारतीय क्रिकेट संघातील सर्वात हँडसम प्लेयर म्हणून सलीम दुर्रानी प्रसिद्ध होते. अनेक तरुणांच्या गळ्यातील ते ताईत होते. सलमी यांनी बॉलिवूडमध्येही आपलं नशीब आजमावलं आहे. सलीम दुर्रानी त्याच्या जबरदस्त लुक्ससाठीही ओळखले जात होते. त्यांनी बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. 1973 मध्ये सलीम यांनी 'चरित्र' नावाच्या चित्रपटात काम केलं. त्या चित्रपटात दुर्रानी यांनी तेव्हाच्या स्टार अभिनेत्री परवीन बाबी यांच्यासोबत काम केलं होतं. याशिवाय सलीम यांना 2011 मध्ये बीसीसीआयकडून सीके नायडू जीवनगौरव पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे.