Advertisement

गिरीश बापटांचे निधन होऊन 4 दिवसही झाले नाहीत

प्रजापत्र | Saturday, 01/04/2023
बातमी शेअर करा

पुणे - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन 4 दिवसही उलटले नाहीत. तोच पुणे लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी नेत्यांमध्ये चढोओढ सुरू झाल्याचे चित्र आहे.

भाजपचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात त्यांच्या समर्थकांकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर जगदीश मुळीक यांचा उल्लेख 'भावी खासदार' असा करण्यात आला आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली आहे.

 

तुम्ही वाटच बघत होतात का?
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाजप नेते जगदीश मुळीक यांना खडेबोल सुनावले आहेत. ट्विटमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, 10 दिवसांचे सुतक तर संपुद्या. मग लावा बॅनर. का तुम्ही वाटच बघत होतात. म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत. हाच का तुमचा वेगळेपणा. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत. तोवरच तुम्ही बॅट पॅड घालून तयार.

 

जनाची नाही तर मनाची ठेवा
याशिवाय महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनीही या बॅनरबाजीवरुन जगदीश मुळीक यांच्यावर सडकून टीका केली आहे. ट्विटमध्ये सूरज चव्हाण म्हणाले की, भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू दयाची होती. त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत आणि भावी खासदाचे बॅनर पण लावले. जनाची नाही मनाची तरी ठेवा.

 

काँग्रेसचाही मतदारसंघावर दावा
अलीकडेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांनीही पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी दावा सांगायला सुरुवात केली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील एवढी घाई का? गिरीश बापट यांना जाऊन काही दिवसच झाले आहेच. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, असे सुनावलले आहे.

Advertisement

Advertisement