रोड रेज प्रकरणात पटियाला तुरुंगात कैद असलेले पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू १ एप्रिल रोजी तुरुंगाबाहेर येतील. अधिकृत सूत्रांनी सांगितलं की, सिद्धू यांना शनिवारी तुरुंगातून मुक्त केलं जाईल. दरम्यान, सिद्धू यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या बातमीमुळे सिद्धू समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.रोड रेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २० मे रोजी सिद्धू यांनी पटियाला कोर्टात आत्मसमर्पण केलं होतं. उद्या ते तुरुंगातून मुक्त होणार आहेत.
वर्षभरात एकही सुट्टी घेतली नाही
सिद्धू यांनी आतापर्यंत ११ महिन्यांची शिक्षा भोगली आहे. परंतु या काळात एकदाही त्यांनी पॅरोल सुट्टी घेतली नाही. अंमली पदार्थांची तस्करी करणे किंवा मोठ्या गुन्ह्यांमध्ये कैद असलेले गुन्हेगार वगळता इतर सर्व प्रकारच्या कैद्यांना कारागृहातील वर्तनाच्या आधारावर महिन्यातून चार ते पाच दिवसांची सूट दिली जाते. याशिवाय काही सरकारी सुट्ट्यांचाही कैद्यांना लाभ मिळतो. परंतु सिद्धू यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. त्यामुळेच सिद्धू यांना काही दिवस आधीच तुरुंगातून मुक्त केलं जाणार आहे. तुरुंगात शिक्षा भोगत असताना या काळात सिद्धू यांनी योगा आणि ध्यानधारणेवर लक्ष दिलं. या काळात सिद्धू यांनी त्यांची वजन ३४ किलोने कमी केलं आहे.