नवी दिल्ली : हिंडेनबर्ग अहवालाचे वादळ नुकतेच शमले होते की गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाच्या दोन कंपन्यांसाठी पुन्हा धोक्याची घंटा वाजली आहे. आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी फिचने म्हटले की प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अदानी समूहाच्या दोन कंपन्यांवर उच्च कन्टेजन रिस्क आहे. फिचने अदानी समूहातील कंपन्यांना 'बीबीबी' मानांकन दिले असून हा नवीन अहवाल मंगळवारी समोर आला आहे. फिचने म्हटले की यामुळे अदानी ग्रुपच्या आर्थिक लवचिकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
रेटिंग एजन्सी फिच एजन्सीने अदानी ट्रान्समिशन आणि अदानी पोर्ट्स या दोन कंपन्यांना उच्च कन्टेजनवर ठेवले आहे. फिचच्या मते, जोखीम आर्थिक लवचिकतेवर परिणाम करू शकते. हिंडेनबर्ग रिसरच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि अजूनही समूहातील प्रचलित कंपन्या या वाईट टप्प्यातून हळूहळू बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहे.
याशिवाय समूहाचे बहुतेक सिनियर कर्ज ऑफशोअर आहे आणि डिसेंबर २०२२ च्या अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात सुरक्षित आहे, असेही रेटिंग एजन्सीने नमूद केले. सिनियर कर्ज म्हणजे उधार घेतलेल्या पैशाचा संदर्भ आहे, ज्याची एखाद्या कंपनीने प्रथम परतफेड करणे आवश्यक आहे. तसेच समूहाचे यूएस डॉलर बॉण्ड्स २०२४ च्या मध्यापासूनच परिपक्व (मॅच्युअर) होतील, असेही फीचने अहवालात नमूद केले आहे.
बाजारात अदानी शेअर्सची वाटचाल
देशांतर्गत मार्केटच्या सकाळच्या सत्रात ९.४० वाजता बीएसईवर अदानी पोर्ट्सचे शेअर्स २.६२ टक्के वाढीसह ६०९.०५ रुपयांवर व्यवहार करत होते. तर गेल्या एका महिन्याबद्दल बोलायचे तर अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये केवळ ३ टक्के वाढ झाली. त्याच वेळी अदानी ट्रान्समिशनची स्थिती अजूनही बिकट बनली आहे. कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांनी ९६५ रुपयांच्या पातळीवर घसरले. तर चालू आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी अदानी ट्रान्समिशनचे शेअर लोअर सर्किटला धडकले.
अदानी समूहाचे मार्केट कॅप
अदानी समूहाचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) तीन दिवसांत (२८ मार्चपर्यंत) ८०,००० कोटी रुपयांनी ९ लाख कोटी रुपयांवर घसरल्यानंतर नवीन घडामोड समोर आली आहे. अदानी समूह शेअर्समध्ये फेरफार आणि अकाउंटिंग फसवणूक करत असल्याचा आरोप हिंडेनबर्गने आपल्या अहवालात केल्यापासून अदानी समूहाच्या बाजार भांडवलात मोठ्या प्रमाणात घसरण झाली, जी अजूनही थांबलेली नाही. हिंडेनबर्गने अदानी समूहावर मॉरिशसमधून शेल कंपन्या चालवल्याचा आणि मोठ्या प्रमाणावर डोक्यावर कर्जाचा भार असल्याचंही आरोप केला. शॉर्ट सेलरने समूहाचे अध्यक्ष आणि अब्जाधीश गौतम अदानी यांचा भाऊ विनोद अदानी यांच्यावर ऑफशोअर संस्थांचे नेटवर्क चालवल्याचा आरोपही केला. मात्र, अदानी समूहाने वरील आरोप फेटाळून लावले.