अंबाजोगाई - रस्त्याचे काम करायचे असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला आणि तुझ्या मालकाला मुकुंदराजच्या दरीत टाकण्याची धमकी देत साईट सुपरवायझरच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतल्याच्या आरोपावरून चौघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अंबाजोगाई येथील यश कस्ट्रक्शन कंपनीचे साईट सुपरवायझर मयूर सतीश पाटील यांच्या फिर्यादीनुसार, सध्या त्यांच्या कंपनीचे अंबाजोगाई ते मांडवा रोड मांडेखेल दरम्यान रस्त्याचे काम चालू आहे. शनिवारी (दि.२५) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास परळी वेस येथील संदिप उर्फ रॉकी अरविंद गोदाम व त्याच्यासोबत आदित्या मोटे, सचिन जोगदंड, शंकर जोगदंड व अनोळखी दोघे तिथे आले. त्यांनी मयूर पाटील यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील एक तोळे सोन्याची चेन काढून घेतली. यावेळी इतर मजूर आणि कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत मयूरची सुटका केली. त्यानंतर या कामाचे अंदाजपत्रक मला दाखवल्याशिवाय काम करायचे नाही, तुझ्या मालकाला पाच लाख रुपये द्यायला सांग, नाहीतर तुला आणि तुझ्या मालकाला गाडीत नेऊन मुकुंदराज दरीत टाकीन अशी धमकी देत ते सर्वजण हायवा गाडीवर दगडफेक करत तिथून निघून गेले. यापूर्वी देखील एलआयसी रोडवर तुमच्या कंपनीचे काम अडवून अजय हावळे यास मारहाण केली होती असेहि त्या आरोपींनी बजावले. सदर फिर्यादीवरून संदिप उर्फ रॉकी अरविंद गोदाम व त्याच्यासोबत आदित्या मोटे, सचिन जोगदंड, शंकर जोगदंड व अनोळखी दोघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.