देशाच्या राजकारणात ट्रोल नावाची विकृती आणलीच ती मुळात भाजपधार्जिण्या प्रवृत्तीने . आयटीसेलच्या माध्यमातून भाजपच्या विरोधकांना ट्रोल करण्यासाठी कशा पद्धतीने ट्रोल बहाद्दरांची फौजच कार्यरत आहे हे देखील यापूर्वी समोर आलेले आहे. भाजपधार्जिण्या प्रवृत्तीने लावलेली ही विषवल्ली आता इतकी फोफावली आहे की या विषवल्लीच्या मगरमिठीतून खुद्द देशाचे सरन्यायाधीश देखील सुटायला तयार नाहीत. ज्यावेळी एखाद्या अपप्रवृत्तीला राजाश्रय मिळतो , त्यावेळी काय होते हेच आता या निंमित्ताने पाहायला मिळत आहे. जर देशाच्या सरन्यायाधिशांना देखील ट्रॉल केले जात असेल तर अशा विषवल्ली उद्या देशातील सामान्यांचे काय करणार करतील याचा विचारही करवत नाही.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी सुरु असताना देशाच्या सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला आणि राज्यपालांच्या वकिलांना जे काही प्रश्न विचारले त्यामुळे सोशलमिडीयातील भाजपधार्जिण्या बांडगुळांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत, किंबहुना या परपोषिंच्या हाताला एक नवे काम मिळाले आहे. मागच्या ५-६ वर्षात देशभरात 'ट्रोल धाड ' टाकणारी विकृती मोठ्याप्रमाणावर वाढलेली आहे.या विकृतीची विषवल्ली नेमकी कोणी आणि कशी लावली हे यापूर्वीच स्वाती चतुर्वेदी या पत्रकार महिलेने समोर आणले होते. भाजपच्या छत्रछायेखाली आयटी सेल कसा कार्यरत आहे आणि एखाद्या व्यक्तीला कसे ठरवून ट्रॉल केले जाते, हे करणारांना रोजगार कसे मिळतात आणि जाणीवपूर्वक एखाद्याला आयुष्यातून उठवेल अशा पद्धतीने देखील कसे ट्रोल केले जाते, हे चतुर्वेदी यांनी 'आय अँम ट्रोल ' या पुस्तकातून मांडले होते. हे भीषण वास्तव ज्यावेळी समोर आले, खरेतर त्यावेळीच देशातील व्य्वस्थानी सतर्क व्हायला हवे होते . मात्र जेथे या ट्रोल करणाऱ्या टोळक्यांना सत्तेचेच आशीर्वाद असतील तेथे त्यांच्यावर कारवाई करायची कोणी ?
स्वाती चतुर्वेदी यांनी आपल्या पुस्तकातून हे 'ट्रोल वीर ' नेमके कोण आहेत, त्यातील अनेकांना खुद्द देशाचे पंतप्रधान देखील कसे फॉलो करतात, भाजपचे पदाधिकारी आणि मंत्री यांची भूमिका नेमकी काय असते हे सारे समोर मांडले होते. मात्र त्यावर समाजमन पेटायला हवे तितके पेटले नाही हे वास्तव आहे. पूर्वपार जे सांगितले जाते की म्हतारी मेल्याचे दुःख नसते , मात्र काळ सोकावयाला नको असतो, ते या ट्रोल विकृतीच्या बाबतीत पहिले गेले नाही. असेही सध्या समाजची मानसिकताच अशी झाली आहे, की आज सुपात असणारे जात्यातल्यांना हसत असतात, आपल्यालाही उद्या जात्यात जावे लागेल असा विचार करण्याची दूरदृष्टीती समाज हरवून बसला आहे. समाजावर नियंत्रण करणाऱ्या व्यवस्था हरवून बसल्या आहेत . त्यामुळेच आपली वाटचाल अगदीच अराजकाकडे चालली आहे.
देशाच्या सरन्यायाधिशानी महाराष्ट्राच्या तत्कालीन राज्यपालांबाबत आणि सध्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंबाबत काही प्रश्न काय विचारले , ट्रोल बहाद्दरांची फौज देशाच्या सरन्यायाधीशांच्या विरोधात देखील सरसावली. खुद्द देशाच्या सरन्यायाधिशांना ट्रोल करण्याइतका मस्तवालपणा काही पैशांवर पोस्ट करणाऱ्या मुखंडांमध्ये येतो कोठून हा देखील प्रश्न आहे. जेथे भलेभले न्यायालयाच्या अवमान विषयक कायद्यांना घाबरतात , तेथे सोशलमिडीयावरील काही मुखंड थेट देशाच्या सरन्यायाधिशांना लक्ष करू पाहत असतील तर यांच्या मागची 'महाशक्ती ' कोण हे देखील समोर आले पाहिजे. सरन्यायाधिशांना ट्रोल केले गेल्यानंतर देशातील विरोधीपक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. इतकी सजगता तर दाखविणे अपेक्षित होतेच, आता राष्ट्रपती यात काही करतील असा आशावाद आजच्या परिस्थितीत भाबडेपणाच ठरेल आणि राष्ट्रपतींनी काही सूचना दिल्या तरी सत्तांध लोक त्या गांभीर्याने घेतील का हा प्रश्नच आहे. ज्यांचा कधी 'राजधर्माशी ' संबंधच आलेला नाही , त्यांच्याकडून राजकीय सामाजिक संकेतांच्या पालनाची अपेक्षा म्हणजे अरण्यरुदन ठरणार आहे. मात्र आता समाजाने जागे होण्याची वेळ आली आहे. जर देशाचे सरन्यायाधीश देखील या ट्रोल करणाऱ्या टोळक्यांना काहीच वाटत नसतील आणि सरन्यायाधिशांना ट्रोल केले गेल्यानंतर देखील सत्तेत बसलेले लोक आणि या देशातील व्यवस्था काहीच हालचाल करणार नसतील तर परिस्थिती आता विकोपाला गेली आहे. ट्रोल नावाची विषवल्ली उद्या कोणाचाही गळा सहज आवळू शकेल , त्यामुळे आता तरी सावध होऊन याच्या विरोधात एकत्र आवाज उठवायचा का नाही हे समाजालाच ठरवावे लागेल.