Advertisement

सहा वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत मोर्चा

प्रजापत्र | Wednesday, 08/03/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे अलिकडेच सहा वर्षीय बालिकेवर साठ वर्षांच्या नराधमाने केलेल्या अत्याचाराचे आज अंबाजोगाई शहरात मोठे पडसाद उमटले. मनस्विनी महिला संघटनेने या अत्याचार प्रकरणी पुढाकार घेत मोठ्या मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात शहरातील विविध शाळां महाविद्यालयातील मधील विद्यार्थी शिक्षिक प्राध्यापकांसह सह राजकीय कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली. अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील एका सहा वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून 60 वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची निंदनीय घटना नुकतीच घडली. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्या वृद्ध नराधमाला पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या होत्या. अत्याचार करण्यात आलेली पिडीत अल्पवयीन बालिका ही अंबाजोगाई येथील एका शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.02) शाळेतून घरी आल्यानंतर ती खेळण्यासाठी गेली. त्यानंतर रात्री ती कोणासही काहीही न बोलता एकटीच शांत बसली. त्यामुळे आई-वडिलांनी तिला विचारले असता पोट दुखत असल्याचे तिने सांगितले. दुसर्‍या दिवशी शाळेतून आल्यानंतरही तिचे पोट दुखत होते. त्यामुळे वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सांगितले की, गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास ती मैत्रिणीसोबत खेळत असताना विष्णू बाबुराव सादुळे (वय 60) हा तिथे आला. चल तुला चॉकलेट देतो असे आमिष दाखवून तो तिला जुन्या घरात घेऊन गेला. तिथे नराधम विष्णूने त्या सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला आणि कोणाला काही सांगितल्यास मारून टाकीन अशी धमकी दिली. सुरुवातीस इभ्रतीच्या भीतीने चिमुकलीच्या मातापित्यांनी कोणालाच काही सांगितले नाही. मात्र, ग्रामस्थांनी धीर दिल्यानंतर त्यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून विष्णू सादुळे याच्यावर पोक्सोसह कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बर्दापूर पोलिसांनी आरोपी विष्णू सादुळे याला तातडीने बेड्या ठोकल्या होत्या . या नराधमास सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास पुढील तपासासाठी 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी पुढील तपास पिंक पथक प्रमुख पोलीस उपनिरिक्षक शिंगाडे करत आहेत. दरम्यान या स़पुर्ण प्रकरणाचा तिर्व्र निषेध व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील सर्व महिला संघटना मनस्विनी महिला प्रकल्पाच्या पुढाकाराखाली एकवटल्या असून आज पुस येथील पिडीत मुलीचे पालक, ग्रामस्थ , शहरातील विविध महिला संघटना, शाळा, महाविद्यालयामधील मुली, शिक्षक- प्राध्यापक, राजकीय, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते यांच्या सहभागासह उपजिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला असून या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement