अंबाजोगाई - येथील अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने रविवारी (दि.०५) सकाळी अंबाजोगाई तालुक्यातील राडी तांडा येथील गावठी हातभट्टीवर छापा मारला. यावेळी पाच जणांना ताब्यात घेत पोलिसांनी १ लाख ८५ हजार रुपयांची दारू आणि रसायन जागेवर नष्ट केले.
होळी आणि धुलीवंदन दोन दिवसावर आले आहे. या दिवशी मद्य सेवनातून अनेक गैरप्रकार घडतात. गैरकृत्त्यांना आला घालण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी त्यांच्या विशेष पथकाला बेकायदेशीर दारूभट्ट्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, राडी तांडा येथे काही व्यक्ती त्यांच्या घरासमोर बसून बेकायदेशीररित्या हातभट्टी तयार करत असल्याची गुप्त माहिती पथकप्रमुख सहा. पोलीस निरिक्षक शिंदे यांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी रडी तांडा येथे छापा मारून रोहिदास किसन आडे, सुंदर रामचंद्र आडे, आकाश विश्वनाथ आडे, गजानन सुभाष आडे आणि सचिन सुंदर आडे या पाच जणांना गावठी हातभट्टीची दारू तयार करताना आणि विक्री करताना रंगेहाथ पकडले. यावेळी पोलिसांनी दारू तयार करण्याचे रसायन आणि तयार दारू असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागेवर नष्ट केला. याप्रकरणी पो.ना. देवानंद देवकते यांच्या फिर्यादीवरून पाचही आरोपींवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई अपर अधीक्षक नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शिंदे, पीएसआय शिंगाडे, पोलीस कर्मचारी राठोड, तागड, बासर, गायकवाड आणि आरसीपीच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.