Advertisement

'त्या' अल्पवयीन वधूची बालसुधारगृहात रवानगी

प्रजापत्र | Sunday, 26/02/2023
बातमी शेअर करा

केज - इयत्ता १० वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीचा बालविवाह मांगवडगाव ( ता. केज ) या मामाच्या गावी झाल्यानंतर औरंगाबाद येथे सासरी पाठविलेल्या या मुलीने नांदण्यास नकार दिला होता. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी गुन्हा नोंद करून दौलताबाद ठाण्याने युसुफवडगाव ठाण्याकडे हा वर्ग केला होता. तर त्या अल्पवयीन वधूची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.  

 

       अंबाजोगाई तालुक्यातील एका १० वीच्या वर्गात शिकत असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या इच्छेविरुद्ध १६ फेब्रुवारी रोजी मांगवडगाव ( ता. केज ) या मामाच्या गावी लावून देण्यात आला होता. औरंगाबाद येथे सासरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलीने लग्न मान्य नसल्याचे सांगून तिने नांदण्यास नकार दिला. त्यावरून तिला मारहाण करून तिला औरंगाबाद येथे अज्ञात स्थळी सोडून तिचे वडील, आजोबा व मामा निघून गेले होते. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी त्या अल्पवयीन विवाहित मुलीने एका महिला व पुरुष या दोन सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने दौलताबाद ( जि. औरंगाबाद ) येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी बालविवाहाचा गुन्हा दाखल झाला होता. सदर घटना ही केज तालुक्यातील असल्याने हा गुन्हा युसुफवडगाव ( ता. केज ) ठाण्याकडे वर्ग केला होता.

 

      दरम्यान, बळजबरीने लग्न लावून दिलेल्या अल्पवयीन विवाहित मुलीची रवानगी औरंगाबाद येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती दौलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद सलगर यांनी दिली.

Advertisement

Advertisement