Advertisement

पत्नीने वाचवले पतीचे प्राण

प्रजापत्र | Thursday, 09/02/2023
बातमी शेअर करा

पत्नीने तिची किडनी दान करून पतीची प्राण वाचवल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. विशेष म्हणजे या निमित्ताने प्रथमच वेगवेगळ्या रक्तगटाच्या 'एचआयव्ही' संक्रमित व्यक्तीचे किडनी प्रत्यारोपण यशस्वी होऊन इतिहास रचला गेला आहे. दोघेही रुग्ण एचआयव्ही बाधित आणि विरोधी रक्तगट असल्याने असे किडनी प्रत्यारोपण होणारी ही पहिलीच नोंद असल्याचा दावा डॉ. सचिन सोनी यांनी केला आहे

दोन्ही रुग्ण ठणठणीत
बीड मधील 48 वर्षांच्या एचआयव्ही बाधित रुग्णाला किडनीच्या आजाराने गेल्या तीन वर्षांपासून ग्रासले होते आणि ते सीएपीडी होम डायलिसिसवर होते. मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी झालेल्या यशस्वी किडनी प्रत्यारोपणांनतर आता दोन्ही रुग्ण बरे असून त्यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते त्यांचे दैनंदिन कामकाज सहजतेने करू शकतात.

अशक्तपणा आला अन्...
बीड जिल्ह्यातील 48 वर्षीय रहिवासी नितीन देसाई (नाव बदलले आहे) हे व्यवसायाने कापूस व्यापारी आहेत. ते 2008 मध्ये ते 'एचआयव्ही' बाधित असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर अँटीरेट्रोव्हायरल थेरपी सुरू करण्यात आली. 2019 मध्ये उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंड निकामी झाल्याचे आढळून आले. त्यांनी २०२० मध्ये प्रथम डॉ. सोनी यांच्याशी संपर्क साधला. ते गेल्या तीन वर्षांपासून होम डायलिसिसवर उपचार घेत होते. मात्र, त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेल्याने त्यांना अशक्तपणा येऊ लागला.

पत्नी पुढे सरसावली...
किडनी प्रत्यारोपणाच्या पर्यायावर रुग्णाच्या कुटुंबीयांशी चर्चा करण्यात आली. रुग्णाची 45 वर्षीय पत्नी ही सुद्धा 'एचआयव्ही' बाधित होती. तीच पतीचा जीव वाचवण्यासाठी किडनी दाता म्हणून पुढे आली. दाता आणि रुग्ण अशा दोघांच्याही पात्रतेची पुष्टी केल्यानंतर, आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर किडनी प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला.

चार तास शस्त्रक्रिया
डॉ. सोनी म्हणाले की, एचआयव्ही रुग्णांची प्रतिकारशक्ती आधीच कमी असते आणि प्रत्यारोपणादरम्यान वापरण्यात येणारी औषधे अशा रुग्णांची प्रतिकारशक्ती आणखी कमकुवत करू शकतात. या रुग्णांसाठी सुधारित औषधांचा डोस आणि उपचारांच्या मदतीने प्रत्यारोपण केले. ही शस्त्रक्रिया सुमारे चार तास चालली. किडनीविकारतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, सहाय्यक, नर्सिंग स्टाफ आणि मदतनीस यांचा समावेश असलेल्या संपूर्ण टीमने आवश्यक खबरदारीचे पालन केले.

जगात पहिल्यांदाच नोंद...
यशस्वी किडनी प्रत्यारोपणानंतर दात्याला 24 जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला आणि प्राप्तकर्त्याला 31 जानेवारी रोजी घरी सोडण्यात आले. हे अवयव प्रत्यारोपण अतिशय आव्हानात्मक होते. रुग्ण आणि दाता दोघेही 'एचआयव्ही' बाधित आणि रक्तगटातील विसंगती. यामुळे हे आव्हान मोठे होते आणि अशाप्रकारे उपचार केलेल्या रुग्णांची जगभरात कुठेही नोंद नसल्याने या प्रकरणाचा अहवाल लवकरच आम्ही आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करणार असल्याचे डॉ. सोनी म्हणाले.

Advertisement

Advertisement