Advertisement

राज ठाकरे यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द

प्रजापत्र | Wednesday, 18/01/2023
बातमी शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळीच्या कोर्टाने समन्स बजावले आहेत. आज त्यांना कोर्टात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज ठाकरे परळीतील दाखल झाले आहेत. राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांना कोर्टात 11 वाजता हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. ते आता परळी कोर्टात दाखल झाले आहेत.

परळीत दाखल होण्यापूर्वी राज ठाकरे यांचे हेलिप्टर औरंगाबादमध्ये दाखल झाले होते. औरंगाबादच्या पळशी परिसरात सध्या हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते. इंधन भरण्यासाठी ते या ठिकाणी थांबवण्यात आले होते. याठिकाणी काही वेळ थांबून पुढे ते परळीला रवाना झाले. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते जमा झाले होते.

राज ठाकरे जसे परळी कोर्टात दाखल झाले तसे शेकडो मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज ठाकरे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

स्वागत करणारे होर्डिंग

तत्पूर्वी राज ठाकरे यांनी गोपीनाथ गडावर दर्शन घेतले आहे. दरम्यान राज ठाकरेंच्या परळी दौऱ्यानिमित्ताने परळीत मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. शहरातील मुख्य चौकात राज ठाकरे यांच्या स्वागत करणारे होर्डिंग लावण्यात आले आहे.

2008 मध्ये राज ठाकरे यांना अटकेच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी परळी गंगाखेड परिसरात निषेध व्यक्त केला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली होती. त्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पूर्वी देखील राज ठाकरे यांना दोन वेळा वॉरंट जारी करण्यात आले होते. अखेर आज राज ठाकरे परळी कोर्टात हजर होत आहेत.

नेमके प्रकरण काय?

राज ठाकरे यांना 22 ऑक्टोबर 2008 रोजी अटक झाली होती. या अटकेचे राज्यभर पडसाद उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी परळी तालुक्यात अनेक ठिकाणी तोडफोड केली. परळी-गंगाखेळ रोडवरच्या धर्मापुरी फाटा येथे एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक करून तोडफोड केली. या प्रकरणी परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार देण्यात आली होती.

दोन वेळा वॉरंट जारी

याआधी राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी या सुनावणीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांना गेल्या वर्षी 6 जानेवारी 2022 रोजी अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यानंतर 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत परळी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, याविरोधात संजय आघाव, शिवदास बिडगर, अनीस बेग, प्रल्हाद सुरवसे, राम लटपटे यांनी कोर्टात धाव घेऊन अजामीनपात्र वॉरंट रद्द केले होते. त्यानंतर राज यांना 13 एप्रिल रोजी दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

Advertisement

Advertisement