अंबाजोगाई - भरधाव वेगातील फॉर्च्युनरने रोडच्या कडेला थांबलेल्या ॲपे रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सात जण जबर जखमी झाले. जखमीत चार महिलांचा समावेश आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता अंबाजोगाई - केज रोडवर लोखंडी सावरगाव येथे झाला.
अंबाजोगाईहून प्रवाशी घेऊन दिपेवडगावला निघालेला ॲपे रिक्षा लोखंडी सावरगावच्या पेट्रोल पंपाजवळील पुलावर समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देण्यासाठी रस्त्याच्या बाजूला मातीच्या ढिगाऱ्याआड थांबला होता. यावेळी लातूरहून भरधाव वेगात आलेल्या फॉर्च्युनरच्या चालकाचे गाडीवरील (एमएच ४४ आर १२१२) नियंत्रण सुटले आणि त्याने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील सुनील रामभाऊ कदम (वय ४०, रा. दिपेवडगाव, ता. केज) हे जागीच ठार झाले. तर, रिक्षातील सुमन निळकंठ गुळभिले (४०), शीला लहू कसबे (४०) यांच्यासह चार महिला आणि चार पुरुष गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धावलेल्या ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
फॉर्च्युनर चालक युसुफ वडगाव ठाण्यात हजर
दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळाहून गाडी घेऊन पलायन केलेला फॉर्च्युनरचा चालक थेट युसुफ वडगाव ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी सदरील गाडी आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. लातूरहून गाडीची सर्व्हिसिंग करून तो गावकडे परत निघाला होता असे समजते.
गोवा सहलीचा आनंद ठरला औट घटकेचा
अपघातात मयत झालेले सुनील कदम हे इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करायचे. नुकतेच त्यांना एका कंपनीने तीन दिवसांचा गोवा टूर बक्षीस दिला होता. तीन दिवसांची गोवा सहल आटोपून सुनील सायंकाळी अंबाजोगाई बस स्थानकात उतरले आणि गावकडे जाण्यासाठी रिक्षात बसले. परंतु, घरी जाण्यापूर्वी वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.